सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल
By विलास जळकोटकर | Published: March 2, 2024 06:59 PM2024-03-02T18:59:18+5:302024-03-02T18:59:32+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत.
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत. दररोज पाचेहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. शनिवारी ५२८ केसेस करुन त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, यामध्ये शानके साथ बाईक चालवताना ७२ जणांना महागात पडले. त्यांच्या खिशाला भुर्दंड पडला.
सोलापूर शहरात नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशान्वये अवैध कृत्य करणाऱ्यांसह शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडवणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाहतूक शाखा झाडून कामाला लागली आहे. दररोज पाचशेहून अधिक केसेस दाखल होऊ लागल्या असून, शासकीय तिजोरीमध्ये लाखोंचा दंडही जमा होऊ लागला आहे. यामध्ये दंड महत्त्वाचा नसून, वाहनचालकांना शिस्त लागावी हा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी राबवलेल्या मोहिमेत ट्रिपलसीट चालवणारे ५१, मोबाईलवर बोलणारे ७, विना गणवेष रिक्षाचालक २४, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे ६६, बुलेटला बेकायदेशीर सायलेन्सर वापरणारे ३०, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले ९०आणि इतर कलमान्वये १९५ अशा ५२८ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाई सुरुच राहणार
सदरची कारवाई ही यापुढेही चालू राहणार असून, शहरवासीयांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. दंड वेळेत भरावा तो पुन्हा नाही भरल्यास अधिक भुर्दंड बसू शकतो, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले.