कोठेंच्या उमेदवारीसाठी १८ नगरसेवकांनी रात्री १२ वाजता ठोठावले तानाजी सावंतांचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:40 PM2019-09-26T12:40:50+5:302019-09-26T13:02:03+5:30
उमेदवारीवरून रस्सीखेच; सोनारी येथील निवासस्थानी सावंत म्हणाले, पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम करा
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कोठे गटाचे १८ नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी मंगळवारी रात्री १२ वाजता जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचे सोनारी (जि. उस्मानाबाद) येथील निवासस्थान गाठले. त्यावेळी आतमध्ये माजी आमदार दिलीप माने, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, गणेश वानकर बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा विषय दिवसभर चर्चेत होता.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने इच्छुक आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचा कौल दिलीप माने यांच्या बाजूने असल्याचे उघडपणे दिसत आहे. माने यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. कोठे गटाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, तुकाराम मस्के, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, उमेश गायकवाड, भारतसिंग बडूरवाले, गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह सागर पिसे, शंकर पवार, सुनील खटके, विष्णू बरगंडे, नागनाथ सामल, भीमाशंकर अंकाराम, विजय पुकाळे, परशुराम भिसे यांच्यासह इतर जणांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमाराला तानाजी सावंत यांचे सोनारीच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्यावरील घर गाठले. कोठे समर्थकांच्या आगमनापूर्वीच तानाजी सावंत यांच्यासोबत दिलीप माने, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची खलबते सुरू होती. त्यामुळे बंगल्यातील लोकांनी कोठे समर्थकांना वेगळ्या खोलीत बसविले. खलबते केल्यानंतर बाहेर पडणाºया लोकांना नगरसेवकांच्या चालकांनी पाहिले. हे ऐकून कोठे समर्थक अवाक् झाले.
रात्री ११.३० ते १२ या दरम्यान तानाजी सावंत यांनी कोठे समर्थकांना भेट दिली. सावंत यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करा. शेवटी उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत’, असे स्पष्टीकरण दिले.
जुन्या नेत्यांची जुळवाजुळव
- - कोठे गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे. महेश कोठे यांच्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढविली. निवडणुकीपूर्वी २०० पेक्षा जास्त शाखा उघडल्या. तरीही त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या माणसाला उमेदवारी दिली जात आहे. यातून नगरसेवक नाराज होतील, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
- सावंत यांच्या भेटीनंतर सर्वजण ‘मातोश्री’वर पोहोचले
- - तानाजी सावंत यांची भेट घेतल्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील गुरुवारी जाहीर केला जाणार आहे.