टाकी पाण्याची.. पार्टी मात्र दारुची; सोलापुरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची सुरक्षितता वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 01:37 PM2021-01-20T13:37:28+5:302021-01-20T13:37:34+5:30
सोलापुरातील टाक्यांची सुरक्षितता वाऱ्यावर : अस्वच्छता अन् धोकादायक सेल्फी पाॅइंटही !
दीपक दुपारगुडे
सोलापूर : शहराच्या चारही दिशांना असलेल्या उंचच उंच पाण्याच्या टाक्यांमधून प्रत्येक सोलापूरकराच्या घरामध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो...पण शहरवासीयांनो! तुमच्या ‘दृष्टीआड सृष्टी आहे’.. त्या मुळात सुरक्षित नाहीतच! तिथं टाकीवर कोणीही जाऊ शकतं. दारूच्या पार्ट्याही होतात. पाण्यात कोणी काही विषारी द्रव मिसळला तर त्याचा पत्ताही लागणार नाही...कारण या टाक्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणाच नाही...अगदी ‘आवो जावो घर तुम्हारा!’ अशीच स्थिती आहे.
‘लोकमत’च्या चमूने या टाक्यांची पाहणी केली. येथे सारंच थक्क करणारं होतं. कोणी विचारणाराच नसल्यामुळे तेथे अनेक ‘उद्योग’ चालतात. नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. एकतर चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो, त्यातही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जसा बेजबाबदारपणा दाखवतो तसाच या टाक्यांच्या सुरक्षेबाबतही आहे. हा विभाग कमालीचा बेजबाबदार असल्याचे निदर्शनास आले.
अक्कलकोट रोड एमआयडीसी सुरक्षारक्षक नाही, गेट, कंपाउंड नाही, टाकीखाली स्मार्ट सिटीच्या कामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे, जनावरे बसण्यासाठी कायमची जागा, व्हॉल्व्ह मोकळे असून, त्यामध्ये कचरा आणि दारूच्या बाटल्या. शिवाय व्हाॅल्व्हमधून पाणी गळती होते. टाकीखाली मोकाट जनावरांचा मुक्त संचार.
होटगी रोड एमआयडीसी
येथे टाकीच्या बाजूला संरक्षक जाळी तोडून नागरिक सरळ टाकीवर जाऊन सेल्फी काढत होते, तर खाली मद्य पिण्यासाठी वापर केला जात होता. सुरक्षा रक्षक नसल्याने सहजासहजी टाकीवर प्रवेश करता येतो.
अक्कलकोट एमआयडीसी
टाकीखाली झोन क्रमांक ३ चे कार्यालय आहे, संरक्षक जाळी, सुरक्षारक्षक नाही, कार्यालय बंद, टाकीच्या परिसरात गवत वाढलेले होते.
अशोक चौक : गेंटालय चित्रपटगृहासमोरील टाकीखाली काही मद्यपी बसलेले, तर काही झोपलेले होते. परिसरात जनावरे होती. सुरक्षारक्षक नसल्याने कोणीही कधीही ये-जा करू शकतो.
पोलीस आयुक्तालय : येथील पाण्याच्या टाकीजवळ चावीवाला दिसून आला. येथेच महानगरपालिकेचे कार्यालय असल्याने साफसफाई दिसून आली. मात्र, परिसरात विविध साहित्य ठेवण्यात आलेले दिसून आले.
अक्कलकोट रोड : टाकीखाली मद्यपींच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या, गेटचे दार सताड उघडे होते. टाकीखाली झोपण्यासाठी जागेचा वापर, परिसरात गवत आणि घाणीचे साम्राज्य होते. खाली ऑफिस असूनही कायम ते बंद असते.