कलेक्टर अंगठ्या गिफ्ट देणार असल्याची थाप; तोतया ड्रायव्हरने पळवल्या अंगठ्या अन् लॉकेट
By विलास जळकोटकर | Published: August 19, 2023 04:44 PM2023-08-19T16:44:32+5:302023-08-19T16:44:43+5:30
सराफाच्या तक्रारीनुसार विजापूर नाका पोलिस ठाण्यात संदीप वाघमारे नामक इसमाविरुद्ध १८ रोजी गुन्हा नोंदला आहे.
सोलापूर : चोरटे फसवणुकीसाठी अनेक फंडे वापरत आहेत. एका चोरट्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर ड्रायव्हर असल्याचे सांगून जिल्हाधिकारी मिटिंगला आलेल्या लोकांना अंगठ्या देणार आहेत, अशी थाप मारून दुकानातून सहा अंगठ्या, तीन लॉकेट असे साडेसहा तोळे १ लाख ३३ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी विजापूर रोड येथील निहाल ज्वेलर्स येथे सकाळी ११.३५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी सराफ अय्याज मकबूल मुल्ला या सराफाच्या तक्रारीनुसार विजापूर नाका पोलिस ठाण्यात संदीप वाघमारे नामक इसमाविरुद्ध १८ रोजी गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अयाज मुल्ला यांचे विजापूर रोडवर सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी यातील पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स परिधान केलेला व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. त्याने आपले नाव संदीप वाघमारे असल्याचे सांगत ‘मी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. जिल्हाधिकारी मिटिंगसाठी आलेल्या लोकांना अंगठी, लॉकेट गिफ्ट देत आहेत, अशी थाप मारली. सराफ मुल्ला यांच्याकडून सहा अंगठ्या व तीन लॉकेट असे १ लाख ३३ हजारांचे दागिने घेऊन तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी अय्याज मकबूल मुल्लांनी सदर विजापूर नाका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. तपास सपोनि देशमुख करीत आहेत.