आई-बाबा गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स; सोलापुरातील प्रशासन अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 03:13 PM2021-05-15T15:13:31+5:302021-05-15T15:13:38+5:30

सोलापूर : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत; अथवा गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नयेत, याची दक्षता राज्य ...

Task Force for Lost Parents; Administration Alert in Solapur | आई-बाबा गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स; सोलापुरातील प्रशासन अलर्ट

आई-बाबा गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स; सोलापुरातील प्रशासन अलर्ट

Next

सोलापूर : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत; अथवा गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नयेत, याची दक्षता राज्य शासनातर्फे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.            

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात झाली. त्या बैठकीत शंभरकर यांनी सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. शशिकांत मोकाशी, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, अनुजा कुलकर्णी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बालगृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, बालकांची विशेष काळजी घ्यावी, निरीक्षणगृहांना आवश्यक असणारा निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना शंभरकर यांनी दिल्या.

कुणी अनाथ असेल, तर कळवा

जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली मुले आहेत का, असल्यास कोणत्या तालुक्यात आहेत, याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश शंभरकर यांनी दिले. याबाबत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अनाथ बालके असल्यास त्याबाबतची माहिती टास्क फोर्सला सादर करावी, अशा सूचना शंभरकर यांनी दिल्या.

Web Title: Task Force for Lost Parents; Administration Alert in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.