सोलापूरच्या राहुलची भरारी! प्रदूषणविराेधी उपकरण घेतले टाटांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 06:02 AM2023-05-07T06:02:00+5:302023-05-07T06:02:16+5:30
सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूरच्या युवा संशोधक इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी चारचाकी वाहन क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी तयार केलेल्या उपकरणाचं पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांनी विकत घेतलं आहे.
सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं. घरची अर्थिक स्थिती बेताची असल्याने राहुल यांनी दुचाकी, चारचाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करतानाच गाड्यांनी होणारे प्रदूषण कमी करण्याची कल्पना त्यांना सुचली. अनेक दिवस संशोधन करून त्यांनी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला.
इंडियन स्टँडर्डच्या मानांकनानुसार हे उपकरण बनवले आहे. या उपकरणासाठी तीन ते चार कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व या पेटंटची मागणी केली. परंतु त्यांनी पे पेटंट टाटा कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.
सायलेन्सरजवळ बसविले जाते
चारचाकी गाड्यांची दूषित हवा बाहेर फेकल्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजेच सायलेन्सरजवळ हे उपकरण बसविले जाते. पीसीएम या सेन्सरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. त्यामुळे सायलेन्सद्वारे बाहेर फेकली जाणारी ३० टक्के दूषित हवा रिसायकल होऊन पुन्हा इंजिनमध्ये सोडली जाते.
त्यामुळे प्रदूषणात सरासरी ३० टक्के घट तर होतेच; तसेच नायट्रोजन ऑक्साइडही ७० टक्के कमी करण्यात याची मदत होते. याशिवाय गाडीचे मायलेजही सुधारते.
नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू चारचाकी वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साइड हा मानवी शरीरावर घातक असतो. टाटा मोटर्सकडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे.