...म्हणून 'या' महिलांनी बनवला घाण पाण्याचा चहा; मतदानावर टाकला बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:07 PM2019-10-21T15:07:05+5:302019-10-21T15:15:23+5:30
जुना बोरामणी नाका येथील प्रकार; घरात पाणी शिरल्याने संतप्त झाले नागरिक
सोलापूर : पावसाचे पाणी घरात शिरले़..संसार उघड्यावर आला..क़ोणतीच शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, अशा एक ना अनेक तक्रारीचा पाडा वाचत सोलापुरातील संतप्त महिलांनी घाण पाण्यात चहा शिजवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. याचवेळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संतप्त महिलांनी आम्ही मतदान करणार नसल्याचा पवित्रा घेतला.
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून विधानसभेसाठी मतदान सुरू झाले़ मात्र रविवारी रात्रीपासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील घरा घरात पाणी शिरले़ यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले़ काही लोकांना रात्र जागावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या जुना बोरामणी नाका येथील महिलांनी पावसाच्या साचलेल्या घाण पाण्यात भर रस्त्यांवर चूल मांडुन चहा शिजविला़ यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ संतप्त महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.