शिक्षक-पदवीधर निवडणूक; १९७ मतदान केंद्रांवर सव्वाचार हजार कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:05 PM2020-11-30T13:05:03+5:302020-11-30T13:05:08+5:30
मंगळवारच्या मतदानाची यंत्रणा सज्ज; सर्वच मतदान केंद्रावर असणार सीसीटीव्हीची नजर
सोलापूर : पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आहे. जिल्ह्यात १९७ मतदान केंद्रांवर जवळपास ४ हजार १९४ कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दोन्ही मतदारसंघाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी शंभरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.
शंभरकर म्हणाले, १९७ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र व्हिडिओद्वारे मतदान केंद्रातील प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तसेच पुणे विभागातील अधिकाऱ्यांना लाइव्ह बघता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणार आहे. तसेच ज्या मतदाराच्या तोंडावर मास्क नाही त्याला मास्कची उपलब्धता करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर तैनात कर्मचाऱ्यांना फेस शील्ड मास्क देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराची थर्मल मशीनद्वारे तपासणी होणार आहे. त्यानंतर हातावर सॅनिटायझर दिला जाणार आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता जिल्ह्यातील ६७ हजार सोलापूरकर मतदानाचा हक्क बजावतील. दोन्ही मतदारसंघात एकूण पाच लाख मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघाकरिता ४ लाख २६ हजार ४३० मतदार तर शिक्षक मतदारसंघाकरिता ७२ हजार ५४५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाकरिता ५३ हजार ८१३ मतदार तर शिक्षक मतदारसंघाकरिता १३ हजार ५८४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दोन्ही मतदारसंघात एकूण ४५ तृतीयपंथी मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघात २५ तर शिक्षक मतदारसंघात २० मतदार हे तृतीयपंथीय आहेत. ४५ पैकी ३१ तृतीयपंथी मतदार हे पुण्यातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघाच्या ५३ हजार मतदारापैकी एक मतदार हे तृतीयपंथी आहेत.
सकाळी ८ ते सायंकाळी ५ वेळेत मतदान
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर ६२ उमेदवार तर शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवार १ डिसेंबर रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या व तोतयागिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होईल.
अशी आहे सोलापूर जिल्ह्यातील यंत्रणा...
- एकूण ४१९४ कर्मचारी तैनात
- मतदान केंद्रावरील कर्मचारी -१९७०
- क्षेत्रीय अधिकारी -६२
- भरारी पथक- ४२ (१६८ अधिकारी व कर्मचारी)
- एसएसटी -११ (४४ अधिकारी व कर्मचारी)
- सूक्ष्म निरीक्षक- २१७
- आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचारी -३९४
- पोलीस कर्मचारी -१३३९