शिक्षक निघाले पालकांच्या भेटीला; इंग्रजी, गणित, शास्त्र विषयासाठीच शाळेत यावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 04:30 PM2020-11-19T16:30:29+5:302020-11-19T16:32:57+5:30
शिक्षण विभागाने दिलेल्या परिपत्रकानुसार नववी ते बारावी वर्ग सुरू करण्याची तयारी
सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शिक्षक पालकांची संमती घेण्यासाठी घरोघरी जात आहेत. फक्त इंग्रजी, गणित व शास्त्र विषयाच्या शिक्षणासाठीच विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बैठका घेऊन वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी वर्गावर येणाऱ्या शिक्षकांना दर पंधरवड्याला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आता सुरुवातीला वर्गावर हजर राहणाऱ्या शिक्षकांना चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सोय करण्यात येत आहे. त्याचबरोबर पालकांची संमती घेण्यासाठी वर्ग शिक्षक प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत. पन्नास टक्के विद्यार्थी उपस्थितीप्रमाणे फक्त दोन दिवसांतून एकदा विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे. यात प्रामुख्याने फक्त इंग्रजी, गणित व शास्त्र विषयांचेच वर्ग भरणार आहेत. वर्गांचा तासिका अवधी कमी करण्यात आला आहे.
ऑनलाईन शिक्षण चालूच राहणार
इतर विषयासाठी ऑनलाईन शिक्षण हा पर्याय सुरूच राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी सांगितले. वर्ग सुरू करण्याच्या तयारीसंदर्भात गुरुवारी मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक होणार आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाचीही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यामध्ये दिशा ठरविली जाणार आहे.