शिक्षक दिनावर सोलापूरातील शिक्षक संघटनेचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:04 PM2018-08-30T13:04:55+5:302018-08-30T13:06:47+5:30
काळ्या फिती लावून काम करणार, अन्य शिक्षक संघटनांची सावध भूमिका
सोलापूर : ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या समारंभावर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या दोन्ही गटांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाचे हे अस्त्र उपसले असले तरी अन्य शिक्षक संघटनांनी मात्र सावध भूमिका घेत या निर्णयापासून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न केला आहे. यामुळे या आंदोलनात एकमेव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना उतरणार असल्याचे दिसत आहे.
मुख्याध्यापकांची पदोन्नती, चटोपाध्याय वेतन श्रेणी आणि पदवीधर शिक्षकांच्या मुद्यावर संघटनेने बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे शिक्षकांमधूनच भरली जातात. अशी १८९ पदे सोलापूर जिल्ह्यात रिक्त आहेत. चटोपाध्याय वेतन श्रेणीच्या लाभापासून शिक्षक वंचित आहेत. २३ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेला १२ वर्षे पूर्ण झालेले २८८ शिक्षक असून, २३ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानंतरचे सुमारे २५० शिक्षक आहेत. या सर्वांना चटोपाध्याय वेतन श्रेणी मिळण्याची मागणी आहे. पाचवी ते आठवीला शिकविणाºया २५० बी. एड. पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलने करूनही केवळ आश्वासने मिळाली. आमरण उपोषणानंतर अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले. मात्र पूर्तता न झाल्याने शिक्षकदिनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे या दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. या दिवशी काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेपुढे निदर्शने करण्याचे शिवाजीराव पाटील गटाने ठरविले आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. या संघटनेच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्ष व सरचिटणीसांनी अलीकडेच आपले राजीनामे राज्य कार्यकारिणीकडे सोपविले आहेत. त्यामुळे बहिष्काराच्या भूमिकेसंदर्भात शिक्षक समितीची कसलीही भूमिका ठरलेली नाही. राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे अमोगसिद्ध कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संघटनेचे दोन्ही गट आंदोलनात...
- महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये राज्यस्तरावर दोन गट आहेत. जिल्ह्यातही दोन गट पडले आहेत. शिवाजीराव पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले आणि संभाजीराव थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष एम. जे. मोरे या दोघांनीही या आंदोलनात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आंदोलनाची नोटीस दिली.
पदवीधर संघटना दूर...
- जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेची आंदोलनामागील भूमिका योग्य असली तरी वेळ चुकली, अशा शब्दात पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना व कें द्रप्रमुख संघटनेने टोला हाणला आहे. शिक्षक दिनाचा कार्यक्रम पूर्णत: शिक्षकांच्या सन्मानाचा असतानाही या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा संघटनेचा निर्णय चुकीचा आहे, अशा शब्दात अध्यक्ष राजाराम चव्हाण यांंनी या निर्णयाची भलावण केली. संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. मात्र या बहिष्कारात आपली संघटना सहभागी न होता कार्यक्रमात सहभागी होईल, असे ते म्हणाले.