कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची धावपळ; सोमवारपासून विद्यार्थ्यांची होणार पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:23 PM2020-11-21T13:23:23+5:302020-11-21T13:26:56+5:30

आरोग्य विभागाची सोय : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली शहरातील शाळांची पाहणी

Teachers rush for corona test; Students will be on the run from Monday | कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची धावपळ; सोमवारपासून विद्यार्थ्यांची होणार पळापळ

कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची धावपळ; सोमवारपासून विद्यार्थ्यांची होणार पळापळ

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यावर सर्वच माध्यमिक शाळांमध्ये तयारी सुरू शाळा सुरू करण्याबाबत कोणालाही सक्ती नसल्याचे शिक्षणाधिकारी बाबर यांनी सांगितलेमुख्याध्यापकांनी सर्वच शिक्षकांना कामावर हजर राहण्याचे फर्मान सोडल्याचे दिसून आले

सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या तयारीला वेग आला असून, कोरोना चाचणी करण्यासाठी शिक्षकांची धावपळ वाढल्याचे शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत शहरातील दोन शाळांना भेटी देऊन तयारीची पाहणी करून शिक्षकांना सूचना दिल्या.

२३ नोव्हेंबरपासून शहर आणि जिल्ह्यातील १ हजार ८७ माध्यमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये पटसंख्येवर २ लाख ५२ हजार ४३४ इतके विद्यार्थी आहेत. इंग्रजी, गणित आणि शास्त्र विषयांचेच वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इतर विषयांचे कामकाज पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन चालणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व इतर अशा ११४ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे पाचही नागरी आरोग्य केंद्रात ही सोय करण्यात आली आहे. चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची आरोग्य केंद्राकडे धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्यासमवेत श्राविका ज्युनिअर कॉलेज व जैन गुरूकुल प्रशालेला भेट देऊन शाळा तयारीची पाहणी केली. शाळेतील वर्ग, परिसर दररोज निर्जंतुक करून घ्यावा व शाळेत प्रवेश करणाऱ्या या विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी व आसन व्यवस्थेबाबत काळजी घेण्याबाबत शिक्षकांना सूचना दिल्या.

शिक्षकांचा गृहभेटीवर भर

पालकांची संमती मिळविण्यासाठी शिक्षकांनी गृहभेटीवर भर दिला आहे. अशात अँटिजेन चाचणीसाठी शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे. दाराशा केंद्रावर केवळ दोन तास चाचणीसाठी वेळ दिल्याने उशिरा आलेले शिक्षक आल्या पावली परतले.

ऑनलाईन, ऑफलाईनचा गोंधळ

शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यावर सर्वच माध्यमिक शाळांमध्ये तयारी सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत कोणालाही सक्ती नसल्याचे शिक्षणाधिकारी बाबर यांनी सांगितले. पण ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबाबत शाळांमध्ये गोंधळ दिसला. मुख्याध्यापकांनी सर्वच शिक्षकांना कामावर हजर राहण्याचे फर्मान सोडल्याचे दिसून आले.

Web Title: Teachers rush for corona test; Students will be on the run from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.