पथकानं बांधावर येऊन केली पाहणी.. तीन महिने विलंबानं बळीराजा नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:42+5:302020-12-23T04:19:42+5:30
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, ...
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, वीज वितरण आदी शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल व मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी) तुषार व्यास यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार विवेक साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, जिल्हा उपनिंबधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यांच्या बांधावर जाऊन पाहणी अन् संवाद साधला
केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधांवर जाउन पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. भंडीशेगाव येथील शेतकरी विठ्ठल यलमार यांनी पीक नुकसानीची माहिती दिली, तर मोहन आप्पा कवडे यांनी घरात पाणी आल्याने झालेली पडझड व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे याबाबत माहिती दिली तसेच सुनील सुरवसे यांनी पुरामुळे शेतजमिनीसह डाळिंब पीक वाहून गेल्याचे सांगितले. उपरी येथील शेतकरी शहाजी गव्हाणे यांच्या उसाच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपरी ग्रामस्थांनी पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली, तर टाकळीच्या महादेव काशीद व लालासो देशमुख यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली.
तालुक्यात ६९ हजार शेतकऱ्यांचे ६५ जार हेक्टरचे नुकसान
यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यातील अतिवष्टीमुळे व पुरामुळे ६९,५०० शेतकऱ्यांचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका बाजरी, भुईमूग, ज्वारी, कांदा, सोयाबीन, फळबाग, घरांची पडझड, आदींचा समावेश आहे. तसेच रस्ते, पूल, वीज, बंधारे या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे यावेळी केंद्रीय पथकाला सांगितले.
पथक उशिरा आल्याने शेतकरी संतप्त
तीन महिन्यांपूर्वी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, फळबागा, पिके, जनावरे, घरे, रस्ते, वीज, पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत मिळणे गरजेच होत. मात्र केंद्राचे पथकच तब्बल तीन महिन्यांनी नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडला.
-----
फोटो ओळी -
उपरी व भंडी शेगाव परिसरांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.
===Photopath===
221220\22sol_6_22122020_4.jpg
===Caption===
उपरी व भंडी शेगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.