त्या काक स्पर्शाने अख्या गावाच्या डोळयातून अश्रुधारा; ब्रह्मपुरीतील अनाहूत घटनेची सर्वत्र चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 01:44 PM2020-11-01T13:44:25+5:302020-11-01T13:45:08+5:30
सोलापूर लोकमत विशेष
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : पिंडाला कावळा शिवतो म्हणजे नेमके काय असते ? याबाबत समाजात अनेक समज आहेत, मात्र मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे शनिवारी गावकऱ्यांना याबाबत असाच एक विलक्षण अनुभव पहिला मिळाला. गावातील सर्व समाजातील प्रमुख त्या घासाने भरलेल्या ताटाजवळ जातात, गावकऱ्यांच्यावतीने वचन दिले जाते अन् पाऊण तास दूर अंतरावरून फिरणारा कावळा काही क्षणात येऊन पटकन त्या गावकऱ्यांसमोरच घासाला स्पर्श करतो. अन् काय या घटनेने अख्ख्या गावाला रडू कोसळू लागते. ही अनाहूत घटना शनिवारी सकाळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे घडली आहे.
ब्रह्मपुरी येथील श्री संत दामाजी साखर कारखाना चे माजी संचालक धनंजय पाटील यांचे गुरुवारी निधन झाले. त्याचा रक्षा विसर्जन कार्यक्रम शनिवारी ब्रह्मपुरी येथे होता त्यांच्या अकाली निधनाने गावात एकच शोककळा पसरली होती. पहिल्या मुलाच्या निधनाने दोन्ही मुलाला खूप जपणाऱ्या त्या मुलाचे छत्र हिरावल्याने सर्व गावकरी हळहळत होते. त्याच्या अस्थी पूजनांनतर विविध पदार्थांनी भरलेले ताट काक स्पर्शासाठी ठेवले होते. बराच वेळ झाला तरी कावळा त्या ताटा कडे फिरकला नाही दोन्ही मुलांनी आपल्या नातेवाईकांसोबत दर्शन घेतले.
कावळा ज़र पिंडाला शिवत नसेल तर काही इच्छा अपूर्ण असेल तर पुर्ण करू अशी क़बूली देतात. यासाठी दोन्ही मुलासह नातेवाईकांसह सगळ्यांचे नमस्कार झाले तरी कावळा काही पिंडाला शिवेना...आप्तेष्ट, हितचिंतक आपापल्यापरिने सल्ले देऊ लागले. जेणेकरून कावळा पिंडाला शिवेल. तरीही कावळा काही शिवेना. सगळे बोलणे झाले होते. पण उपयोग होत नव्हता. दूर अंतरावर गिरक्या घेणारे कावळे जवळ यायचे नाव घेत नव्हते. हा प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता.
अखेर गावातील सर्व समाजातील प्रमुख व जेष्ठ व्यक्तींनी त्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तुझ्या पश्चात दोन्ही मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे नीट सांभाळू. त्यांना कधीही अंतर दिले जाणार नाही हे सामूहिक वचन दिले. अन काय तो चमत्कार झाला गेले पाऊण तास दूर अंतरावरून गिरकी घेणारे एक दोन नव्हे तर तब्बल चार कावळे क्षणात आले अन भरलेल्या ताटातील बरेचशे पदार्थ मनसोक खाल्ले. गावकऱ्यांच्या शब्दासाठी तासभर अडत धरलेला आत्मा तृप्त झाला. कावळयाचा ताटाला स्पर्श होताच उपस्थित अख्या गावाला, नातेवाईकांना अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून एकसाथ अश्रुधारा बरसू लागल्या. काक स्पर्शाचे अनेकजनांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे अनुभव घेतले मात्र हा काक स्पर्शाचा अनुभव विलक्षण होता. सर्व गावकऱ्यांना गावकऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणारा होता. याची सर्वत्र एकच चर्चा होती.