coronavirus; टेंभुर्णीकरांमध्ये दातृत्वाची परंपरा; ८४ परप्रांतीय मजुरांना रोज अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:24 PM2020-04-06T12:24:04+5:302020-04-06T12:28:50+5:30
सामाजिक संघटनांचा पुढाकार; कोरोनाला हद्दपार करण्यासाठी टेंभुर्णीकर एकवटले
डी. एस. गायकवाड
टेंभुर्णी : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे शेल्टर होममध्ये थांबवून ठेवलेल्या मजुरांना अन्नदान करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटना पुढे आल्या आहेत़ टेंभुर्णीकरांनी आपली दातृत्वाची परंपरा चालू ठेवली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने व वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने अनेक परप्रांतीय मजूर बायकामुलांसह पायी चालत आपापल्या प्रांताकडे निघाले होते. परंतु प्रशासनाने आहे तेथेच थांबण्याचे आदेश दिल्याने व पोलीस प्रशासनाने त्याची कडक अंमलबजावणी केल्याने मागील चार-पाच दिवसांपासून टेंभुर्णी येथील महामार्गावरून पायी चालत निघालेल्या ८४ मजुरांना येथेच रोखून महसूल विभागाच्या ताब्यात दिले. महसूल विभागाने येथील संत रोहिदास आश्रमशाळेत शेल्टर होम निर्माण करून या लोकांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे.
महसूल प्रशासन त्यांच्या जेवणाची सोय करीत आहे, परंतु सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अडचणीत सापडलेल्या मजुरांना चांगले जेवण देण्याच्या भावनेतून टेंभुर्णी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी अन्नदान उपक्रम राबवत आहेत.
आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनवणे, गोरख देशमुख, उपसरपंच धनंजय गोंदिल, संतोष खैरमोडे, समता परिषदेचे बाळासाहेब ढगे, कोतवाल दीपक काळे यांनी वैयक्तिक अन्नदान केले आहे. रावसाहेब देशमुख मित्रमंडळ, टेंभुर्णी फेस्टिव्हल व भारतीय जनता युवा मोर्चा या सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने अन्नदान करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये रावसाहेब देशमुख मित्रमंडळाचे गोरख देशमुख, विलास देशमुख, गणेश केचे, प्रशांत देशमुख, शैलेश ओव्होळ, आप्पा हवालदार, दादा देशमुख यांनी तर टेंभुर्णी फेस्टिव्हलच्या वतीने अध्यक्ष संतोष वाघमारे, रघुनाथ वाघमारे, योगेश दाखले, सोमनाथ नलवडे, आप्पा कसबे आदींनी परिश्रम घेऊन अन्नदान केले.
टेंभुर्णी भाजप युवा मोर्चाच्या वतीनेही होम शेल्टरमधील लोकांना अन्नदान केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संजय टोणपे, सरचिटणीस योगेश बोबडे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश ताबे, विनायक भगत, सुभाष इंदलकर, नागेश बोबडे, बाळासाहेब ढगे, जयवंत पोळ, नागनाथ वाघे, औदुंबर महाडिक आदी उपस्थित होते.
टेंभुर्णी येथे उभारलेल्या शेल्टर होममध्ये एकूण ८४ प्रवासी वास्तव्यास असून, मंडलाधिकारी मनीषा लकडे, तलाठी प्रशांत जाधव, कोतवाल दीपक काळे, स्वयंसेवक किशोर भोरे, धीरज गायकवाड, चंद्रशेखर बारावे हे त्यांची दैनंदिन सोय पाहत आहेत.