दुचाकी पार्किंगमुळे तहसीलदारांचीच गाडी अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:25+5:302020-12-15T04:38:25+5:30

सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच नागरिक दुचाकी-चारचाकी वाहने वेडीवाकडी उभी करून कचेरीरोडवर वाहतुकीला अडथळा करतात; हे नित्याचेच झाले आहे. गेटसमोरच ...

Tehsildar's vehicle got stuck due to two-wheeler parking | दुचाकी पार्किंगमुळे तहसीलदारांचीच गाडी अडकली

दुचाकी पार्किंगमुळे तहसीलदारांचीच गाडी अडकली

Next

सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच नागरिक दुचाकी-चारचाकी वाहने वेडीवाकडी उभी करून कचेरीरोडवर वाहतुकीला अडथळा करतात; हे नित्याचेच झाले आहे. गेटसमोरच वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांना गेटमधून तहसील कार्यालयात प्रवेशही नीट करता येत नाही, तर शासकीय वाहन ये-जा करताना मोठी कोंडी होत होती. याची दखल घेऊन तहसीलदार अभिजित पाटील यांनी गेटसमोर दुतर्फा लाकडी बॅरिकेड्स उभे करून दोन्हीही बाजूला ‘नो पार्किंग’चे फलक लावले होते.

प्रारंभी एक दोन दिवस सर्वांनी नियम पाळले. परंतु नंतर मात्र ‘येरे माझ्या मागल्या’, या म्हणीनुसार नागरिक पुन्हा गेटसमोर वेड्यावाकड्या दुचाकी उभी करू लागल्यामुळे दस्तुरखुद्द तहसीलदारांचीच शासकीय गाडी अडकून पडली. दरम्यान, दुचाकी गाड्या बाजूला घेण्यासाठी वाहतूक पोलीसही उपस्थित नव्हता. अखेर चालकाने गाडीतून खाली उतरून दुचाकी काढण्यासंदर्भात नागरिकांना सांगितले. परंतु एकाही नागरिकाने दुचाकी बाजूला घेण्याचे औदार्य दाखविले नाही. चालकानेच पुढाकार घेऊन गेटसमोरील दुचाकीची सारवासारव केली अन‌् तहसीलदारांची गाडी मार्गस्थ झाली.

वाहतूक पोलिसांची नेमणूक करा

तहसीलदार अभिजित पाटील यांनी तहसील कार्यालयाच्या गेटसमोर नेहमीची होणारी वाहतूक कोंडी व गेटसमोर उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकीस्वरांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

फोटो ओळ :

सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटसमोर वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या केल्यामुळे तहसीलदार अभिजित पाटील यांचीच गाडी अडकून पडल्याचे छायाचित्र.

Web Title: Tehsildar's vehicle got stuck due to two-wheeler parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.