सोलापूर लोकसभेसाठी तेलुगू भाषिक तरुण म्हणतील तीच ‘पूर्व’ दिशा ठरणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:00 PM2019-03-27T15:00:41+5:302019-03-27T15:03:04+5:30

तीन लाख मतांकडे सर्वांचे लक्ष, टेक्स्टाईल अन् कामगारांचे प्रश्न ठरणार कळीचे मुद्दे

Telugu speaking youth will be the same as 'East' direction for Solapur Lok Sabha! | सोलापूर लोकसभेसाठी तेलुगू भाषिक तरुण म्हणतील तीच ‘पूर्व’ दिशा ठरणार !

सोलापूर लोकसभेसाठी तेलुगू भाषिक तरुण म्हणतील तीच ‘पूर्व’ दिशा ठरणार !

Next
ठळक मुद्देतेलुगू भाषिकांकडे आज एकमुखी नेतृत्व नसल्यामुळे संख्येने मोठ्या प्रमाणात असूनही मतदार विखुरलेले आहेतलोकसभेला कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय स्वत:च्या अस्तित्वाबद्दल सजग असलेल्या तरुण पिढीच्या ‘मूड’वर ठरणार

महेश कुलकर्णी 

सोलापूर : वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सोलापूर शहराच्या राजकारणावर मजबूत पकड असणाºया तेलुगू भाषिकांकडे आज एकमुखी नेतृत्व नसल्यामुळे संख्येने मोठ्या प्रमाणात असूनही मतदार विखुरलेले आहेत. तीन लाखांच्या आसपास तेलुगू भाषिक मतांकडे सर्वांचे लक्ष असले तरी यावेळी लोकसभेला कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय स्वत:च्या अस्तित्वाबद्दल सजग असलेल्या तरुण पिढीच्या ‘मूड’वर ठरणार असल्याचे तेलुगू भाषिक जाणकारांचे म्हणणे आहे.

१९६२ साली संयुक्त महाराष्टÑाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघातून कामगार नेते व्यंकप्पा मडूर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर वस्त्रोद्योग, हातमाग आणि मोठ्या संख्येने येथे काम करणारे कामगार यांच्यामुळे तेलुुगू भाषिकांचा दबदबा वाढला. १९८० ते १९९८ अशी सलग अठरा वर्षे तेलुगू भाषिकांचा खासदार होता.

यामध्ये काँग्रेसकडून दोनवेळा गंगाधरपंत कुचन, दोनवेळा धर्मण्णा सादूल आणि भाजपाकडून एक टर्म कै. लिंगराज वल्याळ हे सोलापूरचे खासदार होते. अर्थात त्यावेळी सर्वाधिक असणारे तेलुगू भाषिकांचे मतदान यामुळेच ही तिन्ही नेते लोकसभेत जाऊ शकले. याबरोबरच कै. रामकृष्णपंत बेत  यांनी मंत्रीपद, नरसय्या आडम  यांनी विधानसभेची कारकीर्द गाजवली. त्याकाळी शहराचा महापौरही तेलुगू भाषिकांकडून ठरविला जात होता. शहराच्या सत्ताकारणात एवढी मोठी भूमिका बजावलेल्या तेलुगू भाषिकांची राजकारणात आज मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे.

अनेक वर्षे काँग्रेस, कम्युनिस्ट आणि त्यानंतर भाजपाच्या मागे राहूनही मूळ प्रश्न न सुटल्याने तेलुगू भाषिक मतदार सध्या संभ्रमात आहे. पद्मशाली, नीलकंठेश्वर, तोगटवीर यासह चार-पाच प्रमुख समाज आहे. या सर्वांचे मतदान मिळून जवळपास तीन लाखांच्या आसपास आहे. एकगठ्ठा झाल्यास निर्णायक ठरू शकतील एवढे मतदार असूनही गेल्या २० वर्षांत तेलुगू भाषिकांच्या  प्रश्नांकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही. 

टेक्स्टाईल उद्योग, यंत्रमाग, हातमाग, विडी कामगार हे चारही घटक अडचणीत आहेत. लाखांच्या संख्येने असणाºया विडी कामगारांचा आज केवळ अर्ध्या मजुरीवर पोट भागवावे लागत आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवसाय म्हणून रेडिमेड कापड उद्योग पुढे आला, परंतु या उद्योगाला म्हणावी तशी ‘लिफ्ट’ न मिळाल्यामुे विडी कामगारांसाठी समर्थ पर्याय म्हणून हा उद्योग पुढे येऊ शकला नाही. 
तेलुगू भाषिकांच्या सर्व वित्तसंस्था, बँका व उद्योग अडचणीत आल्यामुळे नेमकी भूमिका ठरविण्यासाठी कुचन व सादूल यांच्यानंतर एकमुखी नेतृत्व राहिलेले नाही.आर्थिक रसद मिळत नसल्यामुळे निवडणुका लढविण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे वास्तव पूर्व भागातील अभ्यासू, जाणकारांनी अधोरेखित केले आहे.

‘मध्य’ आणि ‘शहर उत्तर’मध्ये ताकद
- तेलुगू भाषिक मतदारांची केवळ सोलापूर लोकसभेला नाही तर शहर उत्तर आणि शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातही मोठी ताकद आहे. शहर उत्तरमध्ये एक लाखापेक्षा जास्त आणि शहर मध्य मतदारसंघातही ८०-९० हजारांच्या आसपास मतदार आहेत. या दोन्ही ठिकाणी तेलुगू भाषिक मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

सारेच पक्ष आपल्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात, पारंपरिक व्यवसाय आणि तेलुगू भाषिकांचे अस्तित्व टिकविण्यासाठी कुठलाही पक्ष प्रयत्न करीत नाही, ही बाब तेलुगू भाषिक तरुणांच्या लक्षात आली आहे. यामुळे या तरुणांचा ‘मूड’ कदाचित निर्णायक ठरू शकतो. तरुणांना ज्येष्ठांनी मार्गदर्शन केल्यास पुन्हा एकदा नव्याने तेलुगू भाषिक एकत्र येऊ शकतील.
- प्रा. विलास बेत

लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ साली सोलापूर मतदारसंघ राखीव झाला. यामुळे तेलुगू भाषिकाला संधी मिळणे शक्य नाही, परंतु जेव्हा रिझर्व्हेशन उठेल तेव्हा नक्कीच तेलुगू भाषिक एक उमेदवार असेल. रोजगाराच्या समस्येमुळे तेलुगू भाषिक मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षांवर नाराज आहेत. यावेळी विचार करून मतदान करण्याचा सर्वांचा कल आहे.
- अशोक इंदापुरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Telugu speaking youth will be the same as 'East' direction for Solapur Lok Sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.