टेंभुर्णी प्रकरणात दुसऱ्या दिवशीही नाेंदवले जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:59+5:302021-06-01T04:16:59+5:30
टेंभुर्णी : पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावल्याच्या तक्रारीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची चौकशी समिती ...
टेंभुर्णी : पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावल्याच्या तक्रारीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची चौकशी समिती नेमली असून त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये थांबून संबंधित पोलीस कर्मचारी व पोलीस वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींचेही जबाब नोंदवून घेतले. सध्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा पदभार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
चौकशी पूर्ण होताच योग्य ती कारवाई केली जाईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कारवाईची मागणी करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
---
लवकरच कारवाई : पोलीस अधीक्षक
टेंभुर्णीतील अमानवीय घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणात लवकरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई होईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही जणांचे जबाब नोंदवले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली तसेच या घटनेशी संबंधित सुमारे १८ महिला व १२ पुरुष तसेच तक्रारदार संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. याचबरोबर सरपंच प्रमोद कुटे व भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे ,लहुजी शक्ती सेनेचे अनिल आरडे, भीमक्रांती मोर्चाचे महावीर वजाळे, रिपाई आठवले गटाचे संघटक परमेश्वर खरात, रिपाई (ए)गटाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, दलित स्वयंसेवक संघाचे अनिल जगताप, ॲड. अजिंक्य संगीतराव तसेच नाथा सावंत, महावीर वजाळे, संतोष वाघमारे यांचे ही जबाब नोंदवून घेतले .
---
जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या आदेशाने पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला व तरुण मुली-मुलांना बोलून विना मास्क पोलीस स्टेशन आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावली. ही घटना निंदनीय आहे, संबंधितांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. - ॲड अजिंक्य संगीतराव
---
बळाचा वापर करून महिला व पुरुषांना पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलावयास लावून अपमानित केल्याबद्दल व अपशब्द वापरून बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करू.
- रामभाऊ वाघमारे
जिल्हाध्यक्ष मातंग एकता आंदोलन
--
टेंभुर्णी पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. कारवाई न झाल्यास विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.
- जयवंत पोळ
जिल्हाध्यक्ष- रिपाई (ए) गट