३० जूनपर्यंत देऊळ बंद; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:55 PM2020-06-01T12:55:34+5:302020-06-01T12:59:02+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय; विठ्ठलाचे दर्शन पुन्हा लांबणीवर...!
पंढरपूर : सध्या दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कोरोना बाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांनी एकत्र येणे टाळणे गरजेचे असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुन्हा देऊळ बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. यामुळे ३० जून पर्यंत श्री विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितली.
श्री विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक गर्दी करतात. यामुळे श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने ३० जून २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात देखिल कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. तसेच ३१ मे रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ३० जून २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या सर्व बाबी विचारात घेता, मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३० जूनपर्यत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.