पुजारी नेमण्यावरून मंदिर समितीचा ‘यु टर्न’
By Admin | Published: June 12, 2014 12:54 AM2014-06-12T00:54:16+5:302014-06-12T00:54:16+5:30
ब्राह्मणेतर, महिलांचा समावेश तूर्त नको
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पूजा व विधीसाठी ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्यांबरोबरच महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन तसा ठरावही केला होता. दरम्यान वारकरी संघटनेने आंदोलने छेडण्यास सुरुवात केल्याने मंदिर समितीने यु टर्न घेत ‘पुजारी नेमताय थोडं थांबा’ असे म्हणत ब्राह्मणेतर व महिलांचा समावेश करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील बडवे-उत्पातांना काढून त्यांच्या जागी स्वतंत्र पुजारी नेमण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मंदिर समितीने स्थानिक कर्मचाऱ्यांना पूजा व विधी करण्याची जबाबदारी दिली होती. दरम्यान शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांचे अर्ज मागवून १८ मे रोजी त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यासाठी राज्यासह परराज्यांतील तब्बल १२९ जणांनी सहभाग घेतला. यात १६ महिलाही होत्या. दरम्यान मंदिर समितीने पूजेसाठी ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्यांबरोबर महिलांनाही पूजेसाठी नेमण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वारकरी, फडकरी व अन्य वारकरी संघटनेकडून विरोध होत असल्याने हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. पुजाऱ्यांच्या मुलाखती पंचांगकर्ते मोहन दाते, माणिक जंगम, श्रीनिवास पल्ललू यांनी घेतल्या तर निमंत्रित म्हणून मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, जयवंत भंडारे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी काम पाहिले. पुजारी नेमण्याबाबत मंदिर समिती न्याय व विधी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली करीत असल्याने वारकऱ्यांनी रान पेटविले व महिला, ब्राह्मणेतर समाजाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. असे निर्णय घेण्याचा अधिकार मुळात अस्थायी असलेल्या मंदिर समितीला नसल्याचा आरोप केला. यामुळे मंदिर समितीने सावध भूमिका घेत ऐन आषाढीच्या तोंडावर डोकेदुखी नको म्हणून आपला निश्चित निर्णय बदलत पुजाऱ्यांच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्या आहेत.
-------------------------------
मंदिर समितीने पुजारी नेमण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर वारकऱ्यांतून विरोध होत आहे. यामुळे आता मंदिर समितीकडून न्याय व विधी विभागाकडे प्रस्ताव दाखल करून मत मागविणार आहोत. त्या विभागाच्या आदेशानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- संजय तेली, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतल्यानंतर देशासह परदेशातूनही या निर्णयाचे कौतुक झाले. मात्र याला विरोध होत असल्याने आता न्याय व विधी विभागाच्या सूचनेनुसार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
- वसंतराव पाटील, सदस्य, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर