मंदिरे उघडली...पर्यटनस्थळांना परवानगी दिली तरच हॉटेल्स सुरळीत चालतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:29 AM2020-07-07T11:29:26+5:302020-07-07T11:31:03+5:30
उद्यापासून जुलैपासून लॉजमधील होॅटेल्स सुरू होणार; वस्ताद, कामगार, ग्राहक पुन्हा येण्याची शक्यता कमीच
प्रभू पुजारी
सोलापूर : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली लॉजमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट ८ जुलैपासून सुरू होणार असल्याचे शासनाने जाहीर केले, मात्र जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे उघडली, पर्यटनस्थळांना परवानगी दिली तरच हॉटेल व्यवसाय सुरळीत चालतील, असे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे़ शिवाय जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत़ त्यामुळे देशासह राज्यातून देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येणाºया पर्यटकांची संख्याही जास्त आहे़ भाविक आणि पर्यटकांमुळेच जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन हजारांपेक्षा जास्त हॉटेल व्यवसाय जोमाने चालतात़ या माध्यमातून मोठ्या संख्येने बेरोजगारांनाही रोजगार मिळाला़ यातून दररोज कोट्यवधींची उलाढाल होते, असे हॉटेल चालकांनी सांगितले.
राज्यातून धार्मिक पर्यटनासाठी येणारे भाविक पंढरपूरचे पांडुरंग, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर, तुळजापूरची आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, गाणगापूरचे दत्त मंदिर या ठिकाणी देवदर्शन नक्कीच करतात़ याशिवाय अकलूजचे सयाजी पार्क, पंढरपूर येथील उभारलेले तुळशी वृंदावन, संत कैकाडी महाराजांचे मठ, चंद्रभागेत पवित्र स्नान, पुंडलिकाचे दर्शन, गोपाळपूरचे श्रीकृष्ण मंदिर, विष्णुपद मंदिर या ठिकाणी नक्कीच भाविक जातात़ मनोरंजनाबरोबरच धार्मिक पर्यटनही होते़
सोलापुरात आल्यानंतर काही खवय्ये सोलापुरी कडक भाकरी, शेंगाची चटणी, शेंगापोळीचा नक्कीच आस्वाद घेतात़ याशिवाय सोलापूरची चादरीही खरेदी करतात.
पुण्याहून निघाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यावर टेंभुर्णी, मोडनिंब, मोहोळ व सोलापूर या मार्गावर सुमारे ४०० हॉटेल आहेत़ अकलूजमार्गे वेळापूर, पंढरपूर, मोहोळ, सोलापूरपर्यंत २५० पेक्षा जास्त हॉटेल आहेत़ सोलापूरपासून अक्कलकोटपर्यंत १५ ते २० आणि पुढे गाणगापूरपर्यंत १० हॉटेलची संख्या आहे़ सोलापूर ते तुळजापूरपर्यंतही २५ हॉटेल आहेत़ याशिवाय सोलापूर शहरात १००० ते १२०० हॉटेलची संख्या आहे़ राज्य शासनाने जर या लॉजमधील हॉटेल व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी दिली तर मंदिरे उघडण्यासही परवानगी द्यावी, तरच ही सर्व हॉटेल सुरळीत चालतील, असा विश्वास हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.
हॉटेल्स सुरू करण्यास अडचणी
लॉकडाऊननंतर महामार्गावरील लॉज हॉटेलमधील वस्ताद, कामगार हे परप्रांतीय असल्याने ते आपापल्या गावी गेले आहेत़ त्यांना पुन्हा बोलावून घ्यावे लागेल़ ते नाही आले तर कसे सुरू करणार? अशी अडचण हॉटेल चालकांसमोर आहे़ ते आलेच तर कोठे बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे़ बाजार समित्याही बंद आहेत़ त्यामुळे हॉटेलसाठी लागणाºया पालेभाज्या, फळभाज्याही मिळवणे कठीण जाईल़ तसेच हॉटेल सुरू करण्यास शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे़ ग्राहकांना सेवा देताना मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे़ वारंवार हॉटेल निर्जंतुकीकरण करावे लागेल़ गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागेल, असे हॉटेल चालकांनी सांगितले़
शासनाने लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला तरी अनेक गंभीर प्रश्न आहेत. यामध्ये कामगारांचा प्रश्न मोठा आहे. ९० टक्के कामगार परप्रांतीय आहेत. यातील अनेक कामगार परत येण्याच्या मन:स्थितीत नाहीत. धार्मिक स्थळेही बंद असल्याने प्रवासी व पर्यटकांची संख्या रोडावलेली आहे. यातच सोलापूर हॉटस्पॉट असल्याने बाहेरून येणाºया प्रवाशांना परवानगी मिळत नाही़ तसेच प्रवाशीही या भागातील हॉटेलमध्ये थांबण्यास धजावणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांचाही प्रश्न आहे़ धार्मिक स्थळे खुली झाली व कामगार परत आल्याशिवाय हॉटेल व्यवसाय उभारी धरू शकणार नाही.
- रणजित बोत्रे, हॉटेल व्यावसायिक, टेंभुर्णी