द्राक्ष, पपई व्यापाऱ्याकडे पोहोच न करता टेम्पो चालकानेच केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:23+5:302021-05-05T04:36:23+5:30
बामणी (ता. सांगोला) येथील नवनाथ गोरख भोसले यांचे सांगोला-पंढरपूर रोडलगत पाटणे यांच्या गाळ्यात द्राक्ष, पपई असा शेतीमाल ट्रान्सपोर्ट मार्फत ...
बामणी (ता. सांगोला) येथील नवनाथ गोरख भोसले यांचे सांगोला-पंढरपूर रोडलगत पाटणे यांच्या गाळ्यात द्राक्ष, पपई असा शेतीमाल ट्रान्सपोर्ट मार्फत पाठविण्याचे कार्यालय आहे. माळखांबी (ता. माळशिरस) येथील राम ऊर्फ राहुल पवार याच्या मालकीच्या एमएच १३/ सीयू २७४५ या टेम्पोत २५ एप्रिल रोजी पपई, द्राक्ष असा सुमारे ४ लाख ३५ हजार रुपयांचा शेतीमाल बिहार (पूर्णिया) येथील व्यापाऱ्याकडे पोहोच करण्यास सांगून ट्रान्सपोर्ट मालक नवनाथ भोसले यांनी चालक राम पवार यास ॲडव्हान्स ६० हजार रुपये दिले होते.
सदरचा टेम्पो २८ एप्रिल रोजी बिहार (पूर्णिया) येथे पोहोचणे अपेक्षित होते. परंतु वाहन वेळेवर न पोहोचल्याने भोसले यांनी चालकाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी बिहार येथील व्यापाऱ्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी पाठवलेला माल अद्याप पोहोच झाला नसल्याचे सांगितले. त्यावरून चालक राम ऊर्फ राहुल पवार याने ट्रान्सपोर्ट मालक नवनाथ भोसले यांना विश्वासात घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी सदर मालाची विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे उघड झाले.
याबाबत नवनाथ गोरख भोसले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी राम ऊर्फ राहुल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.