जप्त केलेला वाळू उपसा करणारा टेम्पो दोन तासांत तहसीलच्या आवारातून पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:37+5:302021-09-18T04:23:37+5:30
तहसीलदार अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार तलाठी ए. के. राजवाडे, तलाठी डी. एन. सोनुने, शिपाई विनय भारत अटक असे तिघे ...
तहसीलदार अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार तलाठी ए. के. राजवाडे, तलाठी डी. एन. सोनुने, शिपाई विनय भारत अटक असे तिघे मिळून १४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास सांगोला येथील जांगळेवस्ती माण नदीपात्रात कारवाईसाठी गेले होते. येथे वाहनमालक नयन तांबोळी (रा. सांगोला) हा अवैधरीत्या विना नंबरच्या टेम्पोतून चोरून वाळूची वाहतूक करीत असताना टेम्पोसह सापडला. महसूलच्या पथकाने हा टेम्पो त्याचवेळी पहाटे सव्वापाच्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या आवारात लावून घरी निघून गेले.
----
टेम्पोचालकाविरुद्ध तक्रार
शिपाई विनय अटक सकाळी ७ च्या सुमारास तहसील कार्यालयात आले असता पकडलेला टेम्पो दिसला नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेऊनही तो दिसला नाही. वाहन मालक नयन तांबोळी याने सकाळी ७ च्या सुमारास संबंधित अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय टेम्पो पळवून नेला. हा प्रकार तहसीलदार अभिजित पाटील यांना कळवला. त्यांच्या आदेशावरून शिपाई विनय अटक यांनी वाहन मालक नयन तांबोळी (रा. सांगोला) याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
----