सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवर ५०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:20 PM2020-08-07T12:20:07+5:302020-08-07T12:24:30+5:30
महापालिका आयुक्तांची माहिती : १७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार
सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवर ५०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. जागेची पाहणी करण्यासाठी एक पथक शुक्रवारी सोलापुरात येत आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी स्थापलेल्या शहर समितीची सभा गुरुवारी मनपाच्या कौन्सिल हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी महापौर यन्नम होत्या. या बैठकीनंतर आयुक्त म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. गेल्या २० दिवसांत १६ हजार टेस्ट झाल्या आहेत.
टेस्ट करून घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नियोजन केले आहे. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने ५०० बेडचे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमवेत बुधवारी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडील पथक उद्या या जागेची पाहणी करेल.
बॉईस हॉस्पिटलही अत्याधुनिक होणार
महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईस प्रसूतिगृहात नव्याने ५० बेडची सुविधा करण्यात येणार आहे. या ठिकाणी आॅक्सिजनचा पुरवठा होईल. बायपॅक मशीनही बसविण्यात येतील. या ठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होतील. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे रियाज खरादी यांनीही सूचना केल्या. मनपा कामगारांना दररोज सकाळचा नाश्ता द्यावा. त्यासाठी वर्षाचे मानधन देऊ, असे चंदनशिवे म्हणाले. किराणा दुकानदार, रिक्षाचालकांनी तातडीने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी, असे खरादी म्हणाले.