सोलापुरात कत्तलीसाठी नेत असताना दहा जनावरे पकडली; तरुणाविरुद्ध गुन्हा
By रवींद्र देशमुख | Published: September 14, 2023 05:46 PM2023-09-14T17:46:31+5:302023-09-14T17:46:39+5:30
हायवेवरील बाळे पुलाखाली उघडीस आला प्रकार
सोलापूर : पिकअपमध्ये दाटीवाटीनं कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दहा जनावरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. या प्रकरणी मुजमिल इक्बाल शेख (वय- ३३, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनुसार यातील एम. एच. १३ ए एन ८३७८ या पिकअपमधून दाटीवाटीनं कोंबून ठेवलेल्या स्थितीत १० जनावरे हवालदार सुखतियार साहेब खान यांच्या निदर्शनास आली. या जनावरांसाठी कोणत्याही प्रकारच्या चाऱ्याची सोय केलेली नव्हती. त्यांना क्रूरतेने वागवत असल्याचे सकृतदर्शनी पोलिसांना दिसले.
या वाहनातील मुजमिल इक्बाल शेख (शिवाजी नगर, बाळे) याला पिकअपमधील जनावरांच्या खरेदीच्या पावत्यांची विचारणा केली असता त्याही आढळल्या नाहीत. वाहन परवानाही नव्हता. ही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने नेत असल्याने पोलिसांनी जनावरांसह पिकअप आणि चालक मुजमिल याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस नाईक कसबे करीत आहेत.