दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 07:14 IST2024-04-29T05:08:36+5:302024-04-29T07:14:41+5:30
माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता.

दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा
सोलापूर : लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया... मतदान जागृतीसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी यंदा गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेत तिरवंडी (ता. माळशिरस) येथील नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु, त्यानंतर तासाभरातच त्यांना देवाज्ञा झाली. अखेरच्या क्षणी त्यांनी बजावलेला मतदानाचा सर्वांत मोठा हक्क लोकशाहीत सर्वांसाठीच कायम प्रेरणादायी ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. दि. २६ ते २८ एप्रिल या कालावधीत १८ पथकांनी या मतदारांच्या घरोघरी जाऊन विहित पद्धतीने मतदान करून घेतले. ३३९ पैकी ८५ वर्षांवरील २८९ तर ३० दिव्यांग अशा एकूण ३१९ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे.
‘त्या’ दहा जणांचा हक्क नियतीने हिरावला
टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारणाऱ्या १० ज्येष्ठ मतदारांचे मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वीच निधन झाले. त्यामुळे दहा व्यक्तींचा हक्क नियतीने हिरावला तर तिरवंडी येथील ज्येष्ठ मतदार नारायण वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अवघ्या एका तासातच त्यांचा मृत्यू झाला.