"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील"
By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 3, 2023 05:49 PM2023-07-03T17:49:19+5:302023-07-03T17:49:37+5:30
माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची माहिती
सोलापूर - पुढील आठ दिवसांत भारतीय जनता पक्षाचे दहा माजी नगरसेवक भारत राष्ट्र समिती मध्ये सामील होतील. के. चंद्रशेखर राव यांच्या सोलापूर दौऱ्यात भेटलेल्या नेत्यांनी पक्षात येण्याची तयारी दर्शविली असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या समक्ष हैदराबाद येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी खासदार तथा बीआरएस पक्षाचे नेते धर्मण्णा सादूल यांनी ‘लोकमत’ला दिली.
मागच्या आठवड्यात के. चंद्रशेखर राव हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी सोलापुरातील विविध पक्षांतील नेत्यांची भेट घेतली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत उद्योजक, मान्यवर तसेच संस्था प्रमुखांची भेट घेतली. बीआरएस पक्ष हा सामान्यांचा आहे. शेतकऱ्यांचा आहे, असे आवाहन करून पक्षात सामील होण्याची विनंती त्यांनी केली. यास काही लोकांनी सहमती दर्शवल्याची माहिती आहे.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत लोकांपेक्षा राजकारणात सक्रिय नेत्यांना पक्षात घेण्यासाठी केसीआर यांची धडपड सुरू आहे. दौऱ्यात नियोजित नसताना केसीआर यांनी काही नेत्यांच्या घरी अचानक भेट दिली. यावेळी भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी केसीआर यांची भेट घेतली. त्यामुळे बीआरएस पक्षात भाजपचे काही नगरसेवक जातील, अशी चर्चा जोर धरली. आता बीआरएस पक्षाचे नेते धर्मण्णा सादूल यांनी यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे काही दिवसांत सोलापुरात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.