गावाच्या विकासासाठी दहा लाखांची देणगी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:01+5:302020-12-16T04:37:01+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गाव पुढाऱ्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने चोपडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ...
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गाव पुढाऱ्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने चोपडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येकवेळी होणाऱ्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत.
मात्र गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे या परिसरातील बागायती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत खर्च टाळून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी युवकांची मागणी आहे. निवडणूक बिनविरोध झाली तर शासनाकडून गावासाठी बक्षीसही मिळेल. त्याचबरोबर चोपडी येथील जाणीव ग्रुपच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १० लाख रुपये देणगीची घोषणा केली आहे. यामुळे गावातील सर्वपक्षीय गावपुढारी, सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी चोपडी गावातील युवकांमधून होत आहे.