दहा हजार किलोमीटर प्रवास.. परदेशी गॉडविट पाहुणे उजनीच्या पाणथळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:19+5:302021-03-13T04:41:19+5:30

मराठीत पाणटिळवा या नावाने परिचित असलेले हे विलायती पाणपक्षी उजनी जलाशयाच्या काठावरील कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, रामवाडी, टाकळी, खातगाव, केत्तूर ...

Ten thousand kilometers journey .. Foreign Godwit visitors on the waters of Ujani | दहा हजार किलोमीटर प्रवास.. परदेशी गॉडविट पाहुणे उजनीच्या पाणथळावर

दहा हजार किलोमीटर प्रवास.. परदेशी गॉडविट पाहुणे उजनीच्या पाणथळावर

Next

मराठीत पाणटिळवा या नावाने परिचित असलेले हे विलायती पाणपक्षी उजनी जलाशयाच्या काठावरील कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, रामवाडी, टाकळी, खातगाव, केत्तूर आदी गावांच्या पाणफुगवट्यावर शेकडोंच्या समूहाने ठिकठिकाणी आढळून येत आहेत. दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी याठिकाणी येणारे हे पक्षीसुद्धा तुलनेने दोन महिने उशिरा आल्याचे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करत आहेत.

हे पक्षी जलाशयाच्या दलदलीच्या ठिकाणी मेअखेरपर्यंत उदरनिर्वाहासाठी थांबतात. पावसाची चाहूल लागली की आपल्या मूळस्थानाकडे परत जातात.

इंग्रजीत वेडर म्हणजे दलदलीत ढांगा टाकत चिखलात चोच घुसवून भक्ष्य शोधणाऱ्या गटातील पाणटिवळा हे पक्षी आकाराने टिटवी एवढे असतात. हे पक्षी बदामी-उदी रंगांचे असतात. त्यांच्या पंखावर पांढरे-काळे ठिपके नक्षीदाररीत्या रचलेले असतात. जलचर असलेल्या या पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण असून, ती बारीक, सरळ व किंचित वर वाकलेली असते व तिचा उपयोग चिखलात खोलपर्यंत घुसवून जलकृमी व कीटक, शिंपले, गोगलगायीसारख्या मृदुकाय प्राणी व खेकडे टिपण्यास होतो.

हे पक्षी स्थलांतर करून भारतात आल्यानंतर समुद्रकिनारे दलदली क्षेत्र व अनेकदा भात शेतात आपले बिऱ्हाड थाटतात. गेल्या महिन्यात उजनी धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जलाशयाच्या काठावर दलदल भाग निर्माण झाल्यामुळे त्याठिकाणी मुबलक अन्न उपलब्ध होत असल्याने हे पक्षी लक्षणीय संख्येने येऊन दाखल झाले आहेत.

------

या पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल आठ ते दहा दिवस न थांबता, न खाता-पिता उडत असतात. या मॅरेथॉन उड्डाणात हे पक्षी अन्य पक्ष्यांच्या तुलनेने खूप कमी ऊर्जा खर्च करत असतात. विमानाचे आतापर्यंत सर्वात दीर्घ उड्डाण, म्हणजे साडेतीन दिवसांची नोंद आहे. मात्र पक्ष्यांच्या उड्डाणाचा विचार केला तर ती जगतातील एक विस्मयकारक घटना म्हणून त्याची नोंद होते.

- डाॅ. अरविंद कुंभार,पक्षी अभ्यास.

---

उजनी जलाशयातून सोलापूरसाठी पाणी सोडल्याने जलाशयाच्या पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आहे. यामुळे दलदलीच्या जागा रिकाम्या होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांची संख्या येथे वरचेवर वाढू लागली आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षिप्रेमी

-----

Web Title: Ten thousand kilometers journey .. Foreign Godwit visitors on the waters of Ujani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.