बेपत्ता गव्यामुळे पाच गावांमध्ये टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 AM2021-06-02T04:17:58+5:302021-06-02T04:17:58+5:30
रविवारी, ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रथमतः कलहिप्परगे येथील पोलीस पाटील संतोष गुजा यांना स्वतःच्या शेतात गवा आढळून ...
रविवारी, ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रथमतः कलहिप्परगे येथील पोलीस पाटील संतोष गुजा यांना स्वतःच्या शेतात गवा आढळून आला होता, याबाबत प्रशासनास माहिती मिळताच वनविभागाने ग्रामस्थांसह शोधमोहीम सुरू केली आहे. वनपाल प्रकाश डोंगरे, वनरक्षक एस. एस. मेंगाळे, गंगाधर विभुते, वनसेवक रवी ढब्बे, आकाश पाटोळे, चालक मुन्ना मिरगणे यांचे पथक रविवार रात्री त्यानंतर सोमवार दिवसभर शोधमोहीम घेत आहेत. दुसऱ्या दिवशीसुद्धा शोधकार्यात कोणतेही यश मिळाले नाही.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा वनपरिक्षेत्र अतिरिक्त अधिकारी जयश्री पवार यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांना रानगवा दिसताच परिसरातील नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
----
परिसर सील
वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी सदर रानगवा असण्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. परिसर सील केला आहे. उसाचे क्षेत्र अधिक असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत. अद्याप रानगवा सापडला नाही. वनविभाग व पोलीस कर्मचारी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
---
परिसरातील शावळ, हिळ्ळी, नाविंदगी, करजगी, गौडगाव बु. या पाच गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी रानगव्याला छेडछाड व पाठलाग करू नये. जनजागृती व पेट्रोलिंग सुरू ठेवली आहे.
- अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, सोलापूर.
----
परिसरातील गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहावे. दिसताक्षणी वन अधिकारी यांना कळवावे. त्याच्यामागे लागणे किंवा छेडणे असे प्रकार करू नयेत. इतर गावांनी सुद्धा याबाबत सतर्क राहावे.
- तहसीलदार अंजली मरोड
---
फोटो ३१ अक्कलकोट
ओळ : कलहिप्परगे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार भेट देऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून ग्रामस्थांना सूचना देताना प्रकाश डोंगरे, पोलीस पाटील संतोष गुजा आदी.