मोकाट कुत्र्यांच्या ‘चायनीज’ गँगची दहशत; दीड वर्षात पाच हजार जणांना घेतला चावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 06:15 PM2021-09-08T18:15:12+5:302021-09-08T18:15:18+5:30
मनपाकडे नाही पथक : शहरात वाढला उपद्रव; चायनीज गाड्यांना जणू वेढा
साेलापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात पाच हजारहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचे महापालिकेची आकडेवारी सांगते. दुसरीकडे या कुत्र्यांच्या बंदाेबस्तासाठी पथक नसल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातून सांगण्यात येत आहे.
शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लाेक शिळे अन्न रस्त्यावर टाकून देतात. चायनीज गाडे, हाॅटेल चालक, मांस-मच्छी विक्रेते शिल्लक मांस घंटागाड्यात टाकण्याऐवजी रस्त्यावरच टाकून देतात. यातून भटकी कुत्री अधिक हिंस्र हाेत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे. महापालिकेने दाेन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदाेबस्तासाठी चार ते पाच जणांचे पथक नेमले हाेते. पुढचा-मागचा विचार न करता या कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले. पशुवैद्यकीय विभागाकडे सध्या केवळ एक कामगार असल्याचे सांगण्यात येते. हा एकटा माणूस शहरातील कुत्र्यांचा कसा बंदाेबस्त करणार, असा सवाल नगरसेवकांमधून उपस्थित हाेत आहे.
----
दीड वर्षात रेबीजचे १७ हजारहून अधिक डाेस
महापालिकेच्या माध्यमातून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रेबीजच्या एकूण १६ हजार ३४९ लसी देण्यात आल्या. एका व्यक्तीला किमान चारवेळा लस दिली जाते. एप्रिल ते मार्च या कालावधीत जवळपास ४ हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत किमान एक हजारहून अधिक जणांना डाेस देण्यात आल्याचे मनपाच्या आराेग्य विभागातून सांगण्यात आले. सिव्हीकडील आकडे याहून जास्त आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या बंदाेबस्तासाठी लवकरच पथक नेमण्यात येत आहे. वर्षभरात एक हजारहून अधिक कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्यात आला आहे. नागरिकांनी घरातील शिळे अन्न रस्त्यावर न टाकता घंटागाड्यात टाकावे. चायनीज गाड्यांवरही लवकरच कारवाई करण्यात येईल.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.