पादुका घेऊन जाणाऱ्या महाराज मंडळींची टेस्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:53+5:302020-12-11T04:48:53+5:30
पंढरपूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग, नामदेव, पुंडलिकाच्या पादुका आळंदीकडे जातात. या पादुका घेऊन ...
पंढरपूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग, नामदेव, पुंडलिकाच्या पादुका आळंदीकडे जातात. या पादुका घेऊन आळंदीकडे जाण्यासाठी शासनपरवानगी मिळालेल्या ६० जणांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शुक्रवारी पादुका एस.टी.ने रवाना होणार आहेत.
कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी पंढरपुरात भरणारा आषाढी व कार्तिकी यात्रा सोहळा मोठ्या प्रमाणात न करता शासन नियमानुसार करण्यात आला होता. त्याचपद्धतीने आळंदी येथे होणारा संजीवन समाधी सोहळ्यासाठीदेखील शासनाने नियम आखून दिले आहेत.
पांडुरंगाच्या पादुकाही एसटीने ११ डिसेंबर रोजी सकाळी १०च्या सुमारास आळंदीला जाणार आहेत. यामुळे ९ डिसेंबर रोजी पादुका घेऊन जाणाऱ्यांची कोरोना चाचणी झाली.
पांडुरंग, संत नामदेव महाराज व संत पुंडलिक महाराज यांच्या पादुका एसटीने आळंदीकडे जाणार आहेत. प्रत्येक संताच्या पादुकांसह २० व्यक्तींना एसटी बसने आळंदीला जाण्याची परवानगी दिली आहे. १५ जणांची खासगी ठिकाणी, तर ४५ जणांची कोरोना चाचणी संत तुकाराम महाराज भवन येथे करण्यात आली आहे. सर्वजण कोरोनामुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.