मनाला बसले अस्वस्थतेचे चटके; मुक्या प्राण्यांसाठी पाणपोई सुरू
By काशिनाथ वाघमारे | Published: April 24, 2023 07:11 PM2023-04-24T19:11:05+5:302023-04-24T19:11:25+5:30
विद्यार्थी, शिक्षकांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप
सोलापूर : शहरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. होटगी रोडवरून जाणाऱ्या अनेक मुक्या प्राण्यांची अवस्था पाहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनाला अस्वस्थतेचे चटके बसले. यातून प्रेरणा घेऊन सुरवसे प्रशालेच्या संस्थाचालकांनी मुक्या जनावरांसाठी शाळा परिसरातच पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्यासाठी ५० लिटरची टाकी दिवसातून दोनवेळा भरून ठेवली जात आहे.
सध्या सोलापूर शहरात उन्हाचा पारा ४२ अंशांवर गेला आहे. होडगी रोडवर महिला हॉस्पिटल ते कुमठा नाका रस्त्यावर सुरवसे प्रशाला असून, या शाळेसमोरून गेलेल्या मुख्य रस्त्यावरून दिवसभरातून असंख्य जनावरे जातात. या जनावरांमध्ये प्रामुख्याने बैल, गाय, म्हैस याशिवाय इतर मुके प्राण्यांचा समावेश आहे.
या मुक्या प्राण्यांप्रति या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनाला त्यांच्या चारापाण्याचा प्रश्न सतावत होता. या परिसरात तलावाचा थोडा भाग असून, यातील पाणी दूषित आहे. या प्रश्नाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन अस्वस्थ होत असे. एके दिवशी या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक दत्ताअण्णा सुरवसे, अध्यक्ष राजकुमार सुरवसे, सचिव विजया सुरवसे यांच्यापुढे प्राचार्य उज्ज्वला साळुंखे यांच्या माध्यमातून मनाला अस्वस्थ करणारा हा प्रश्न मांडला. त्यांनी शाळेच्या परिसरात या मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची संकल्पना मांडली. ती सुरवसे कुटुंबाला पटली. त्यांनी तत्काळ सिमेंटची टाकी उपलब्ध केली आणि पाण्याची व्यवस्था केली. आज दिवसभरातून जवळपास शंभरहून अधिक जनावरे आपली तृष्णा येथे भागवतात.
दिवसातून दोनवेळा भरली जाते टाकी
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या संकल्पनेतून सुरू केलेली पाणपोई नियमित ठेवण्यासाठी येथील एका शिपायाच्या मदतीने बोरचे पाणी भरले जाते. सध्या दिवसातून दोनवेळा ही टाकी पाण्याने भरली जाते.