कोरोनाकाळात रजेवर आलेला बंदी पुन्हा कारागृहात पोहोचलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:19 PM2022-12-05T12:19:26+5:302022-12-05T12:20:25+5:30
गुन्हा दाखल; कारागृहाबाहेर अनाधिकृतपणे वास्तव धोकादायक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : रजेवर आलेला बंदी पुन्हा कारागृहात न आल्याने त्याच्यावर मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अमोल रावसाहेब माने (वय ३७, रा. खुले कारागृह, पैठण, जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंदी अशोक आप्पा कोडवन (वय ४०, रा. झळकेवस्ती, पो. कंदलगांव, ता.द.सोलापूर) याच्याविरोधात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सु. मोटो रिट पिटीशननुसार दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या तरतूदीनुसार विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कारागृहातील बंदींना प्रथमत: ४५ दिवसाकरिता अकस्मित अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते, त्यापैकी शिक्षा बंदी क्रमांक सी ५११५ अशोक आप्पा कोडवन (रा. झळकेवस्ती, ता. द. सोलापूर) यास ११ मे २०२२ रोजी खुले जिल्हा कारागृह, पैठण (जि. औरंगाबाद) येथून रजेवर पाठविण्यात आले होते. रजा संपल्यानंतरही बंदी हजर झाले नसल्याने त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याकरिता समन्स बजाविण्यात आले होते, तरीदेखील बंदी हा अद्याप कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्यावर मंद्रुप पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक बुरजे हे करीत आहेत.