वऱ्हाडी लग्नाला आले आणि आरोपी झाले; पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 09:05 AM2022-06-02T09:05:19+5:302022-06-02T09:05:42+5:30
खर्डीतील घटना : बालविवाह लावणाऱ्या भडजी, फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर वर गुन्हा दाखल
पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. मात्र त्या पूर्वीच विवाह सोहळा उरकण्यात आला होता, यामुळे नवरदेव व त्याचे कुटुंब, अल्पवयीन मुलीचे कुटुंब, बालविवाह लावणारा भडजी व त्याचे फोटो काढणारा फोटोग्राफर, या लग्नासाठी आलेल्या व्हराडी या सर्वां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डी (ता. पंढरपूर) गावच्या हद्दीतील एच.पी. पेट्रोल पंपाचे मागे चव्हाण मळा खर्डी ता पंढरपुर येथे बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास बालविवाह झाला. याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी भगवान वसंतराव कुलकर्णी व पोहेकाॅ योगीराज खिलारे यांनी मौजे खर्डी ता पंढरपुर येथे एच पी पेट्रोल पंपा पाठीमागे चव्हाण मळा येथे पथकासह जावुन खात्री केली.
यावेळी वधु ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आलेवर वधुचे वडीलांना तिचे वयाबाबत चौकशी केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. वधुचे जन्मातारखेचा दाखला प्राप्त करून खात्री केली असता वधुचे वय १४ वर्षे ०८ महिने असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम १० प्रमाणे यातील अल्पवयीन मुलीचे नातेवाईक तसेच नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी तसेच ग्रामपंचायत सदस्य व लग्नास उपस्थित असणारे सुमारे १०० ते २०० लोकांविरूध्द ग्रामविकास अधिकारी भगवान वसंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, स.पो.नि आदीनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ योगीराज खिलारे यांनी केली आहे.
--------------------------
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील सर्व नागरीकांना पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की आपले गावामध्ये होत असलेल्या बालविवाहाबाबत पोलीसांना माहीती देवुन बालविवाह रोखणेकरीता सहकार्य करावे.
- : मिलिंद पाटील, पोलिस निरीक्षक, पंढरपूर