चांदणी नदीवर पुलाला भगदाड, बार्शी-भूम वाहतूक झाली ठप्प
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 24, 2024 18:57 IST2024-06-24T18:57:02+5:302024-06-24T18:57:14+5:30
पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.

चांदणी नदीवर पुलाला भगदाड, बार्शी-भूम वाहतूक झाली ठप्प
सोलापूर : बार्शी तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून आगळगावची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे १० हजारांच्या आसपास असून, या गावातून बार्शी-भूम-आगळगाव हा रस्ता तालुक्यास जोडणारा मार्ग आहे. या गावाजवळून जाणाऱ्या चांदणी नदीवरील पुलास मोठे भगदाड पडले असून बार्शी-भूम वाहतूक ठप्प झाली आहे.
आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असल्याने व आगळगाव बाजाराचे केंद्रबिंदू आहे. याच गावातून चांदणी नदी वाहते याच नदीवरील पुलाला गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठे भगदाड पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. चांदणी नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथून झाला असून, या नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी येते. त्यातच पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा तासन् तास वाहतूक खोळंबली जाते. चांदणी नदीवरील पुलाला सुमारे २५ ते ३० वर्षे झाले असून, पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यातच पुलाला भगदाड पडले आहे.
याच पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.
चांदणी नदीच्या पुलावरील भगदाड लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करु.
-पोपट डमरे,
माजी सदस्य, जिल्हा परिषद