बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी, दावं तोडून पळ काढल्याने गाय वाचली
By दिपक दुपारगुडे | Published: August 10, 2023 01:00 PM2023-08-10T13:00:28+5:302023-08-10T13:03:29+5:30
..पण बिबट्याच्या हल्ल्यानंतर दावं तोडून पळाल्याने वासराच्या जवळ असलेल्या गायीचा जीव वाचला.
सोलापूर : गेल्या सहा दिवसांपासून मांगी भागात बिबट्याचा वावर असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र हा बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही. त्याने एका वासरावर हल्ला करून फस्त केले. पण बिबट्याच्या हल्ल्यानंतर दावं तोडून पळाल्याने वासराच्या जवळ असलेल्या गायीचा जीव वाचला.
बिबट्याच्या वावरामुळे मांगी,पोथरे,कामोणे,खडकी या भागात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची तत्काळ दखल घेऊन पुढील पावले उचलावीत, अशी मागणी मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित बागल यांनी केली आहे. माजी आमदार बागल यांच्या शेताकडील बाजूस हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतात नागेश बागल यांची एक गाय व वासरू बांधले होते. मात्र गाय दावं तोडून पळून गेली तर लहान वासरू मात्र बिबट्याने हल्ला करून फस्त केले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनअधिकारी येथे दाखल झाले आहेत.
बिबट्याच्या वावरामुळे रात्री ऐवजी दिवसा वीज द्या
करमाळा तालुक्यातील मांगी व पोथरे परिसरात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाऊसही लांबला आहे. त्यामुळे उसाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यात बिबट्यामुळे भीती आहे. याकडे गांभीर्याने पाहून वीज वितरण कंपनीने मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, आळजापूर भागात दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी पोथरे येथील शहजी झिंजाडे यांनी केली आहे.