विचित्र अपघात... आरटीओची गाडी आडवी आल्याने कंटेनर थांबला, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:38 PM2022-03-15T17:38:59+5:302022-03-15T17:42:45+5:30
मोहन दत्तात्रय आदमाने (वय ५५, रा. शिरापूर, ता. मोहोळ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सोलापूर - राष्ट्रीय महामार्गावर मोहोळकडून सोलापूरला निघालेल्या कंटेनरला अडविण्यासाठी आरटीओ गाडीच्या चालकाने गाडी आडवी घातली. तेव्हा कंटेनर जागीच थांबवल्याने मोहोळकडून शिरापूरकडे निघालेली मोटारसायकल त्या कंटेनरला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना 14 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी, आरटीओ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
मोहन दत्तात्रय आदमाने (वय ५५, रा. शिरापूर, ता. मोहोळ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने कंटेनर (एम एच ४६, बी एम २९१०) निघाला असताना पाठीमागून आरटीओची गाडी (एम. एच. ०४ के. आर. ६४५८) आली. या गाडीतील आरटीओ अधिकाऱ्याने कंटेनरला ओव्हरटेक करीत गाडी आडवी घालून कंटेनर चालकाला कंटेनर उभा करण्यास सांगितले. अचानक आरटीओची गाडी आडवी आल्याने कंटेनर जागीच उभा राहिला. यादरम्यान पाठीमागून मोहोळकडून शिरापूरकडे गावी निघालेले प्रगतिशील बागायतदार मोहन आदमाने हे मोटारसायकल (एम एच १३ सी. एक्स १४०३) वरून जात असताना अचानक उभारलेल्या कंटेनरवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातामध्ये जागीच ठार झाले. दरम्यान, यातील आरटीओ कार्यालयाकडील अधिकारी राजेश आहुजा, शिवाजी सोनटक्के यांच्यासह गाडीतील इतर कर्मचारी यांनी सोलापूरकडे जाणारे हे अचानक हलगर्जीपणाने, निष्काळजीपणाने थांबविल्याने कंटेनरला पाठीमागून मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात मोहन आदमाने हे जागीच ठार झाल्याप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी व कंटेनर चालक यांच्यावर अमोल अर्जुन अदमाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहेत.
हिजाब बंदी योग्य आहे. शाळा कॉलेज मध्ये हिजाब घालण्याची परवानगी नाकारली जाणे योग्य आहे- कर्नाटक उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. हिजाब घालणे हा धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण सगळ्यांनी स्विकारले पाहिजे.
— Asim Sarode (@AsimSarode) March 15, 2022
आरटीओ गाडी, कंटेनरच्या काचा फाेडल्या
शिरापूर येथील मृताच्या नातेवाईकास समजताच संतप्त झालेल्या नातेवाइकांनी घटनास्थळी येऊन आरटीओच्या गाडीतील अधिकारी राजेश अहुजा, शिवाजी सोनटक्के यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करीत आरटीओ गाडीसह कंटेनरच्या काचा फोडल्या. दरम्यान, घटनास्थळी मोहोळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत पुढील होणारा अनर्थ टाळून जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात पाठवून दिले.
मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात
संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह मोहोळ पोलीस स्टेशन आवारात आणत गोंधळ घातला. आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, त्यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली, तर यातील काही युवकांनी येथील पोलिसांनाच शिवीगाळ केली. या झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.