थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी
By काशिनाथ वाघमारे | Published: August 1, 2023 06:38 PM2023-08-01T18:38:42+5:302023-08-01T18:39:00+5:30
सिंचनाचा प्रश्न मिटला : नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे
सोलापूर : पुरंदर, भोर, वेल्ह्याच्या धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील धरणं हळूहळू पूर्ण क्षमतेने भरण्याची वाटचाल सुरू झाली आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे मंगळवारी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणांनी सरासरी पंचाहत्तर टक्के ओलांडली.
धरणाच्या कालव्यावर अवलंबून असणा-या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे. पंधरवड्यापासून या चार धरणांच्या पातळीत वाढ होत आहे.
२० जुलै २०२२ ला चारही धरणांचा पाणीसाठा ४० टक्के म्हणजे १९ द.ल.घ.मी. होता. त्यानंतर २५ जुलैला तो ६० टक्के म्हणजे २९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. मंगळवारी सकाळी ७६.३६ टक्के म्हणजे ३६.८९७ द.ल.घ.मी. झाला. असाच पाऊस राहिला तर १० ऑगस्टपर्यंत चारही धरणांची पातळी १०० टक्के होईल.
३१ जुलै २०२२ पर्यंत नीरेच्या वीर धरणातून दोनवेळा विसर्ग केला होता. यावर्षी मात्र अजून दहा ते पंधरा दिवस नदीत विसर्ग होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. गतवर्षी ३१ जुलै २०२२ रोजी चारही धरणांतील पाणीसाठा ३७.६६७ द.ल.घ.मी. ७७.९४ टक्के होता. १ आगस्ट २०२३ रोजी ३६,८९७ द.ल.घ.मी. ७६:३६ टक्के आहे.
हवामान विभागाकडून पुढील आठ दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आहे. आता धरणातून पाण्याचा विसर्ग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतक-यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे लागले आहेत.
बंधाऱ्याची दर्पे काढली..
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नीरा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दर्पे लावलेली होती. त्यामुळे नदी पात्रात मुबलक पाणी होते. आता सर्व दर्पे काढली आहेत.
१ ऑगस्ट २०२३ सकाळची टक्केवारी
भाटघर : ७८.३५ टक्के, निरा देवघर : ८६.९४ टक्के, वीर : ८०.५६ टक्के, गुंजवणी : ७०.०५ टक्के गतवर्षी १ ऑगस्ट २०२२ रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा ३७.६७९ टीएमसी व टक्केवारी ७७.९६ एवढा होता. आज १ ऑगस्ट २०२३ रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८७९ टीएमसी व ७६.६३ टक्के एवढा आहे.