पाच दिवसांत जिल्ह्यात 15.9 मीमी पावसाची नोंद, तीन नक्षत्रात चांगला पाऊस, कृषी हवामान विभागाचा अंदाज
By शीतलकुमार कांबळे | Published: September 8, 2023 04:03 PM2023-09-08T16:03:34+5:302023-09-08T16:04:00+5:30
Solapur Rain Update: मागील एक महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरीही येत्या तीन नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच दिवसात 15.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - मागील एक महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरीही येत्या तीन नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच दिवसात 15.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी पाऊस पडेल असा अंदाज कृषी हवामान विभागाने वर्तवला आहे.
पूर्वा, उत्तरा व हस्त हे तीन नक्षत्र जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल आहे. जिल्ह्यात पावसाचा अभ्यास केला असता जिल्ह्यात दरवर्षी पुर्वा उत्तरा व हस्त या नक्षत्रात चांगला पाऊस पडत असतो. या तीनही नक्षत्रांचे पाऊस हे इथल्या शेतीसाठी महत्त्वाचे आहेत. या पावसावरच जिल्ह्यातील बहुतांशी शेती अवलंबून असते.
31 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान पूर्वा नक्षत्र, 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत उत्तरा नक्षत्र तर 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हस्त नक्षत्र असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट ते दहा ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार त्याची शक्यता कृषी हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतीची मशागत करणे पेरणी करणे या महत्त्वाच्या शेती संबंधित कामे या नक्षत्र दरम्यानच होत असतात. हरभरा, करडई आदि पिके पावसावरच अवलंबून आहेत.
सध्या पूर्वा नक्षत्र सुरू असून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे 5 सप्टेंबर रोजी जिल्हा 12.5 मिलिमीटर 6 सप्टेंबर रोजी 0.6 मिलिमीटर 7 सप्टेंबर रोजी 0.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला. शुक्रवार दुपारपर्यंत 2.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काही दिवसात पावसात वाढ होण्याची शक्यता कृषी हवामान विभागाने व्यक्त केली आहे.