मुरूम चोरावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी पती-पत्नीने मागितला जोगवा; अनोख्या आंदोलन
By संताजी शिंदे | Published: March 1, 2023 07:04 PM2023-03-01T19:04:06+5:302023-03-01T19:04:12+5:30
सुपीक शेत जमिनीतून माती आणि मुरूम चोरून नेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही.
सोलापूर : सुपीक शेत जमिनीतून माती आणि मुरूम चोरून नेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळ गावातील शेतकरी पती-पत्नीने सोलापुरात बुधवारी जोगवा मांगो आंदोलन केले. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
शेतकरी अशोक ओहोळ व प्रभावती ओहोळ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. गट नं. २३० मध्ये ४ हेक्टर जमीनीपैकी ६ एकर जमीनीमधील सुपीक माती व विहीरीचा उपसा चोरुन नेला आहे. ४ एकर ज्वारीचे उभे पीक चोरून नेले आहे. बोअरमध्ये दगडे टाकून बुजविलेले आहे. पत्राशेड फाडून दरवाजा तोडून कामाचे साहित्य व प्रापचिक साहित्य चोरुन नेले आहे. सर्व पिकाचे व साहित्य शेड, प्रापचिक साहित्य व सुपिक माती व मुरुम यांची नुकसान भरपाई अर्जदार यांना ४ ते ५ लाख रुपये देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
संबंधितावर कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालया समोरील पुनम गेटसमोर प्रतिकात्मक पर्डी तयार करुन, जोगवा भिक मागो आंदोलन उपोषण न्यायांच्या हक्कासाठी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार
पत्रकारांशी बोलताना ओहोळ म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिले होते. मात्र त्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून मला नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला.