धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त
By Appasaheb.patil | Published: January 1, 2023 05:30 PM2023-01-01T17:30:49+5:302023-01-01T17:30:57+5:30
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर : बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. या स्फोटात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला आहे. फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. या घटनेतील जखमींना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळावर पोलिस, तहसिल प्रशासन, अग्निशामक दलाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून बचावकार्याचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल असून मृतदेह व जखमींचे शोध घेत असल्याची माहिती पांगरी येथील डॉक्टरांनी दिली.
पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वीरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता,त्यांनी सांगितले की,पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन महिलांचे मृतदेह आहेत,त्यांची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस प्रशासन त्याबाबत चौकशी करत आहेत, तर तीन महिला गंभीररित्या उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.