उडगीत कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविला, जय हो कर्नाटकचा नारा; महाराष्ट्रात सुविधा नसल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 04:02 PM2022-12-03T16:02:29+5:302022-12-03T16:02:40+5:30
ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावोपाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.
कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे.
कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे. उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी केले आहे.महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे.शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर शेतकऱ्यांना सोईसुविधा मिळतात.
सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाहीत, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामधून जनतेतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उडगी हे महाराष्ट्रात असून येथील उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर, पुणे,मुबंईला जावे लागते.त्यामुळे भाषेची अडचण येते.
कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांना रोजगार यापासून वंचित राहावे लागत आहे. या उलट कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, उसाला वाढीव दर, शेतीसाठी पाणी, हमी भाव,खते, बियाणे,शेतीसाठी अवजारे, डिझेल-पेट्रोल इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिली जाते, असे वेळी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सुरेश माडयाळ, महादेव येळमेली, श्रीकांत कोळी, सोमु आलूरे, रमेश भांड, धुळप्पा जिगजंबगी, विशाल प्याटी, कल्लप्पा कामा,शालेश मकानदार, सुरेश हदपद, उमेश, कोळी, शरणू, कोळी, शरणप्पा कुंभार, देवेंद्र नारायणकर, नागप्पा म्हेत्रे इत्यादी उपस्थित होते.
"महाराष्ट्र राज्य सरकारने १५ व्या वित्तआयोगातून ग्रामपंचायत मिळणारा ५० ते ६० निधी कपात केल्याने परिणामी गावाचा विकास कसा होणार.जल जीवन मिशन मार्च मध्ये मंजूर मिळाली आहे.अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही. आरोग्य उपकेंद्रा मध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सुद्धा अजून तरी औषधे उपलब्ध झाली नाहीत. अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचा वांरोवार पाठपुरावा करावा लागतो. वेळेत राज्य शासनाकडून भौतिक सुविधा पूर्ण क्षमतेने मिळत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत.मात्र ते सुटत नाहीत.त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहोत."
-लक्ष्मीबाई म्हेत्रे, सरपंच, उडगी