सोलापूर : तापमानवाढीच्या चटक्यानं फुल बाजार कोमेजला
By दिपक दुपारगुडे | Published: April 26, 2023 04:35 PM2023-04-26T16:35:24+5:302023-04-26T16:35:32+5:30
त्याचा परिणाम बाजारांमधील फुलांच्या आवक व दरांवरही झाला आहे. तीव्र उन्हामुळे फुले कोमजली आहेत.
सोलापूर : एरव्ही फुलांच्या सुगंधाच्या दरवळीने प्रसन्न असलेला टिळक चौक, मधाळ मारूती आणि मार्केट यार्ड येथील फुल बाजार गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: कोमेजला आहे. यंदा उन्हाचा तडाखा लवकर जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम बाजारांमधील फुलांच्या आवक व दरांवरही झाला आहे. तीव्र उन्हामुळे फुले कोमजली आहेत. त्यामुळे निम्म्याहून कमी दरात फुलांची विक्री करावी लागत आहे. अक्षय तृतीयेला ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले सध्या २० ते २५ रुपयांना विकावी लागत असल्याची माहिती श्रीशैल घुली या फुल व्यापाऱ्यांनी दिली. मधला मारूती आणि मार्केट यार्ड परिसरातील फुल बाजारात किरकोळ विक्रेते आणि भाविक फुलांची खरेदी करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून दुपारी या बाजारात शुकशुकाट आहे.
सोलापूर फुल बाजारात अक्कलकोट, मंगळवेढा, तांदुळवाडी, बोरामणी, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ येथून झेंडूच्या फुलांसह निशिगंध, गुलाब, मोगरा शेतकरी घेऊन येतात.
फुलांचे दर (प्रति किलो रु.)
झेंडू २०-३०
गुलाब ६०-७०
चिनी गुलाब १५०-१८०
मोगरा ४००-४५०
निशिगंध १८०-२००
ग्राहकांची मागणी बदलली
सध्या लग्नात अथवा विविध शुभकार्यांत पारंपरिक हार सोडून नवनवीन पद्धतीने डिझाइन करून तयार केलेले हार ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. अशा हारांचे डिझाइन सोशल मीडियावर पाहून तशाच डिझाइनची मागणी ग्राहक करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.