गावागावात असणार पोलीस पाटलांचे लक्ष; बिट अंमलदारांना गणेश मंडळं दत्तक
By Appasaheb.patil | Published: August 29, 2022 11:42 AM2022-08-29T11:42:09+5:302022-08-29T11:42:16+5:30
सोलापूर तालुका पोलिसांचा उपक्रम; शांतता अबाधित राखण्यासाठी गावोगावी बैठका
सोलापूर : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावोगावच्या पोलीस पाटलांना लक्ष ठेवण्यास सांगितले असून बिट अंमलदारांना गणेश मंडळ दत्तक देण्याची वेगळा उपक्रम यंदा सोलापूर तालुका पोलिसांच्यावतीने राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून विविध गावांना भेटी देऊन गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठका घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिलेल्या सूचना, शासनाने दिलेल्या अटी व नियमांची माहिती देण्यात येत आहे. यासाठी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, गोपाळ साखरे आदी परिश्रम घेत आहेत.
-------
या गावात झाल्या बैठका
कोंडी, पाकणी, बोरामणी, तांदूळवाडी, बिबीदारफळ, कारंबा, गुळवंची यासह आदी गावांमध्ये बैठका घेतल्या. शिवाय पोलीस ठाणे आवारातही काही प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तत्पूर्वी गावातील पोलीस पाटलांची बैठक घेऊनही योग्य ते मार्गदर्शन वरिष्ठांनी केले.
---------
सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन
गणेशोत्सव साजरा करताना दहा दिवसाच्या कालावधीत रक्तदान, वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, आरोग्य शिबिर व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आले.
---------
सोलापूर तालुका पोलीस ठाणे
गावे - ५०
मंडळे - १२०
एक गाव एक गणपती - २०
----------