पाणी नसलेल्या ठिकाणी वन विभाग टँकरने जगविणार झाडे
By शीतलकुमार कांबळे | Published: September 25, 2023 01:36 PM2023-09-25T13:36:13+5:302023-09-25T13:36:24+5:30
३० सप्टेंबरपर्यंत होणार १०० टक्के वृक्षारोपण
सोलापूर : वन विभागाकडून जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या 90 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के वृक्षारोपण पूर्ण होणार आहे. ज्या पाऊस नसलेल्या ठिकाणची झाडे टँकरने पाणी देऊन जगविण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
मागील तीन वर्षांशी तुलना करता यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट वन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाऊ पडला तिथे वृक्षारोपण होत आहे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे टँकरद्वारे झाड जगविण्यात येत आहे.
जिल्हा नियोजनमधून 1.80 एकर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. 10 एकरामध्ये देशी झाडे लावण्यात येत आहेत. एकूण 400 हेक्टरवर वृक्ष लागवड होत आहे. चरे आणि आणि बांध यांच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चांगला आहे. जिल्हातील सर्वच वनक्षेत्रात सध्या वृक्षारोपण सुरु आहे.
दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वृक्षलागवडीचे लक्ष कमी आहे. यंदा पाऊस कमी असला तरी वृक्षलागवडीचे लक्ष आम्ही पूर्ण करणार आहोत. 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपण पूर्ण होईल. त्यानंतर झाडे जगविण्यासाठी गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात येणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग