उजनी-सोलापूर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार; मुंबईतील बैठकीत निर्णय होणार !
By Appasaheb.patil | Published: February 28, 2023 07:21 PM2023-02-28T19:21:18+5:302023-02-28T19:21:57+5:30
उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूर- उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. येत्या दोन दिवसात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मुंबईत बैठक घेणार आहेत, या बैठकीत बंद असलेल्या जलवाहिनीचे काम सुरू करण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भातील निर्णय शनिवारी दौर्यावर आल्यानंतर पालकमंत्री घोषित करतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
सोलापूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामाला सुरूवातही झाली होती, मात्र तांत्रिक व अन्य वादामुळे या जलवाहिनीचे काम मागील वर्षभरापासून बंदच आहे. हे काम दिलेल्या ठेकेदारांचे काम बंद करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी घेतला. बंद काम सुरू करावे या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी आंदोलनं केली. त्यानंतर स्मार्ट सिटीत अधिकार्यांची खांदेपालट झाली. नुकतेच माजी आमदार दिलीप माने यांनीही समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले, आंदोलनात आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले. आता या कामाला सुरूवात करण्याविषयीच्या घडामोंडींना वेग आला आहे. अधिवेशना दरम्यान पालकमंत्री विखे-पाटलांनी स्मार्ट सिटीची बैठक मुंबईत बोलाविली आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होईल असे सांगण्यात आले.
शनिवारी पालकमंत्री सोलापुरात
शनिवार ४ मार्च रोजी पालकमंत्री सोलापूर जिल्हा दाैर्यावर आहेत. या दौर्यात ते समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात मोठी घोषणा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असे सांगण्यात आले.