वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण उद्या; अंधश्रद्धेतून गैरसमज टाळा, दैनंदिन जीवन जगा
By Appasaheb.patil | Published: October 24, 2022 04:47 PM2022-10-24T16:47:24+5:302022-10-24T16:47:39+5:30
सोलापूर : यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. ...
सोलापूर : यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. या काळात दैनंदिन जीवन जगताना अनेक गैरसमज आहेत. त्याकडे लक्ष न देता अंधश्रद्धेतून निर्माण झालेले गैरसमज टाळावेत. ही खगोलीय घटना आहे. ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र आपल्याकडे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचा संबंध धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राशीदेखील जोडला जातो. त्यामुळे ग्रहणविषयी समाजात अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहेत. भारतीय संस्कृतीतील दिवाळी हा महत्त्वाचा सण आहे. यंदा २४ ऑक्टोबर म्हणजेच आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळी सण साजरा होत आहे. अशातच या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबरला होणार आहे. सूर्यग्रहण असो, की चंद्रग्रहण ही महत्त्वाची खगोलीय घटना आहे. मात्र, ग्रहणाविषयी समाजात अनेक समज आणि गैरसमजदेखील आहेत.
----
सूर्यग्रहण शुभ की अशुभ शास्त्रीय प्रमाण नाही
आपल्याकडे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचा संबंध धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राशी जोडला जातो. त्यामुळे ग्रहणविषयी अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहेत. ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी अनेक जण सल्ला देतात. मात्र, या समजुती कितपत योग्य आणि खऱ्या याविषयी शास्त्रीय प्रमाण आढळून येत नाही.
---
हे आहेत गैरसमज
सामान्यत: ग्रहणकाळात भात शिजवू नये, असा समाज आपल्याकडे आहे. तसेच जेवण करणेदेखील चुकीचे मानण्यात येते. मात्र, असे करणे म्हणजे निव्वळ गैरसमज असून, ग्रहण काळात आपल्या नियमित जीवनशैलीप्रमाणे जगावे, असे, तज्ज्ञांचे मत आहे.
----
विज्ञान काय सांगते?
विज्ञानानुसार, ग्रहणाबाबत प्रचलित असलेले समज ही अंधश्रध्दा आहे. कारण सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. याला विज्ञानाचा आधार आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ठरावीक कालावधीनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होत असते. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये. तर चंद्रग्रहणाचा मानवावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसा कोणताही पुरावा नाही असे, नासाचे म्हणणे आहे.
----