सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी
By राकेश कदम | Published: February 23, 2024 05:39 PM2024-02-23T17:39:28+5:302024-02-23T17:41:12+5:30
पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
साेलापूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे-साेयरे हा शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत या मागणीसाठी जिल्ह्यात शनिवारपासून चक्काजाम आंदाेलन हाेणार आहे. पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
पवार म्हणाले, मराठा समाज बांधव ११ तालुक्यात विविध ठिकाणी आंदाेलन करतील. आपल्या गावाच्या शेजारुन जाणारा हमरस्ता, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील. आंदाेलन शांततेत हाेईल. त्याला हिंसक वळण लागेल असे काेणीही वागणार नाही. आंदाेलन सकाळी १०.३० वाजता सुरू करावे. दुपारी १.३० पर्यंत संपवावे. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांना, पालकांना त्रास हाेईल असे काेणतेही कृत्य करू नये.
यावेळी पुरुषाेत्तम बरडे, रवी माेहिते, प्रा. गणेश देशमुख, विनाेद भाेसले, महादेव गवळी, अनंत जाधव आदी उपस्थित हाेते.
शहरात येथे हाेणार आंदाेलन
२४ फेब्रुवारी राेजी मरिआई चाैक मंगळवेढा राेड, २५ फेब्रुवारी आसरा चाैक हाेटगी राेड, २६ फेब्रुवारी मार्केट यार्ड चाैक हैदराबाद राेड, २७ फेब्रुवारी हगलूर जवळ तुळजापूर राेड, २८ फेब्रुवारी मल्लिकार्जुन नगर अक्कलकाेट राेड.
काेणत्याही राजकीय पक्षाने आयाेजित केलेल्या कार्यक्रमांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकावा. काेणत्याही पुढाऱ्याला गावभेट करू देउ नये. त्या पुढाऱ्याशी वाद घालू नका. त्यांना विनंती करून गावात कार्यक्रम घेउ देउ नका. मराठा समाजाचा आरक्षणाची लढाई आपल्याला शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने लढायची आहे. ही लढाई ढाल आणि तलवारीची नसून विचारांची आहे. विचाराने लढायची आहे.
- प्रा. गणेश देशमुख, समन्वयक, सकल मराठा क्रांती माेर्चा.