बुधवार अन् गुरूवारी सोलापुरातील बाजार समिती बंद राहणार; जाणून घ्या नेमकं कारण ?
By Appasaheb.patil | Published: January 9, 2024 05:23 PM2024-01-09T17:23:49+5:302024-01-09T17:24:06+5:30
सध्या कांद्याची मोठया प्रमाणात आवक बाजार समितीमध्ये हाेत आहे. मध्यंतरी ५०० ते ६०० ट्रॅक आवक असलेल्या बाजार समितीत आता ८०० हुन अधिक गाड्या कांद्याची आवक होत आहे
सोलापूर : राज्यात दुसऱ्या क्रमांकांची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ८०० ट्रॅक कांद्याची आवक झाली. आवक वाढल्याने बाजार समितीचे काम होत नसल्याने बुधवार १० जानेवारी २०२४ व गुरूवार ११ जानेवारी २०२४ रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.
सध्या कांद्याची मोठया प्रमाणात आवक बाजार समितीमध्ये हाेत आहे. मध्यंतरी ५०० ते ६०० ट्रॅक आवक असलेल्या बाजार समितीत आता ८०० हुन अधिक गाड्या कांद्याची आवक होत आहे. मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहे. मागील महिन्यात २५०० प्रति क्विंटल मिळत असलेला भाव सध्या १५०० ते १८०० वर आला आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. पाच हजारांपर्यंत पोचलेले दर निर्यातबंदीच्या निर्णयानंतर निम्म्यावर आले असून त्यात अद्याप सुधारणा झालेली नाही. सोलापूर बाजार समितीतील आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त झाली आहे, पण भाव गडगडलेलेच आहेत.