चोरीच्या बाईकवर येऊन घरफोड्या करणारा टोळीचा सूत्रधार पकडला, चौघांचा शोध सुरु
By रवींद्र देशमुख | Published: April 22, 2024 06:04 PM2024-04-22T18:04:19+5:302024-04-22T18:04:50+5:30
तपासात त्याने अन्य चार साथीदाराच्या मदतीने ८ घरफोड्या आणि १ मोटारसाकल चोरी असे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
सोलापूर : रात्रीच्या वेळी चोरी केलेल्या बाईकवर यायचे आणि घरफोड्या करुन पसार होणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्कलकोटच्या बसस्थानकावरुन उचचले. तपासात त्याने अन्य चार साथीदाराच्या मदतीने ८ घरफोड्या आणि १ मोटारसाकल चोरी असे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
धर्मेंद्र विलास भोसले (वय- २२, रा. सिंधगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, श्रावण अमनशा शिंदे, सुनील श्रावण शिंदे, अजय श्रावण शिंदे (रा. सुंभा, जि. धाराशिव), दिनेश पंपू शिंदे (रा. मानमोडी, ता. तुळजापूर) या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागिरक आपल्या घराला कुलूप लावून गच्चीवर अथवा दरवाजा उघडा ठेऊन झोपत असल्याने चोरटे या संधीचा लाभ उठवून घरफोड्याचे गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते.
अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे चोरट्याने २ ते ३ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान घरफोडी करुन ३ लाख १४ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी फौजदार सुरज निंबाळकर, राजू डांगे यांच्या पथकाला या गुन्ह्याच्या शोधासाठी सूचना केल्या होत्या. हे पथक अक्कलकोट उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून एक आरोपी चोरीची मोटारयसाकल विकण्यासाठी अक्कलकोटच्या बसस्थानकावर येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला.
संशयित आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली.